Tanaji Sawant : बँकॉकला जाणारे ऋषिराज सावंत पुण्याला परतले; तानाजी सावंत म्हणाले, घरी न सांगता का गेले याची माहिती घेणार
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant : आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेलेले ऋषिराज सावंत हे पुन्हा बँकॉकला का गेले याची माहिती घेणार असल्याचं माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

पुणे : राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर त्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. बँकॉकच्या मार्गावर असलेले ऋषिराज सावंत हे आता पुण्यात परतले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही, पण ऋषिराज घरी न सांगता बँकाकला का गेला याची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, या सगळ्या गोंधळाची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
पुणे पोलिस सह आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे कंट्रोल रुमला संध्याकाळी 4 वाजता एक निनावी कॉल आला. त्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत तपास सुरू केला.
या दरम्यान तानाजी सावंत हेदेखील पुणे पोलिस आयुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी असं काही झालं नसल्याची माहिती दिली. चार्टर विमानाने ऋषिराज बाहेर गेला असून त्याचे अपहरण झालं नसल्याचं ते म्हणाले. घरी न सांगता गेल्याने आपल्याला काळजी वाटली असंही ते म्हणाले.
बँकॉकला जाणारे ऋषिराज पुण्यात परतले
या घटनेमुळे खळबळ माजल्यानंतर चार्टर प्लेनने बँकॉकला जाणारे ऋषिराज मधल्या वाटेतूनच पुण्याला परतले. त्यानंतर त्यांची आता पोलिस चौकशी होणार आहे. कोणत्या कारणासाठी ते बँकॉकला जाणार होते याची चौकशी केली जाणार आहे. त्यांनी घरी का सांगितलं नाही याची माहितीही समोर येणार आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा या आधीच नोंद करण्यात आला आहे. त्या दृष्टीनेही त्यांची चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ऋषिराज सावंत यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही आहेत. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
आठ दिवसांपूर्वीच दुबई, मग आता बँकॉक का?
ऋषिराज सावंत हे आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेले होते. त्यामुळे आता लगेच बँकॉकला का गेले याची माहिती घेऊ असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. आमच्यात कधीही कोणताही वाद झालेला नाही. पण तो कुणालाही न सांगता गेल्याने आम्हाला काळजी वाटली असं तानाजी सावंत म्हणाले.
ड्रायव्हरने ऋषिराज सावंत यांना विमानतळावर सोडलं आणि तो माघार आला. ऋषिराज सावंत हे चार्टर विमानाने बँकॉकला गेल्याची माहिती ड्रायव्हरने तानाजी सावंत यांना दिली.
तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे ऋषिराज सावंत यांचे बँकॉकच्या दिशेने जाणारे विमान परत पुण्यामध्ये लँड झाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
