(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : काय सांगता! नाशिकच्या शेतकऱ्याने मांजर समजून पाळलं बिबट्याचं पिल्लू अन् पुण्यात
नाशिकच्या एका शेतकऱ्याने मांजरीचं पिल्लू घरात आणलं आणि काही दिवसांनी त्या मांजरीची प्रकृती खराब झाली. त्यानंतर मांजर नसून बछडा असल्याचं समोर आलं.
Pune Leopard News : नाशिकच्या एका शेतकऱ्याने मांजराचं पिल्लू घरात आणलं आणि काही दिवसांनी त्या मांजराची प्रकृती खराब झाली. तिचे केस गळत होते. प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी पिल्लू नसून बछडा असल्याचं समजलं. डॉक्टरांनी या बछड्याचा जीव वाचवला. पुण्यातील रेस्क्यू ट्रस्टमध्ये आता हे पिल्लू दिवसभर पिंजऱ्यात धुमाकूळ घालत आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मांजर समजून हे बिबट्याचं पिल्लू शेतकऱ्यानं पाळलं. या बछड्याच्या पिल्ल्याला मांजर समजून रोज दूध-ब्रेड, पोळी खायला दिली. मात्र काहीच दिवसात ती मांजर नसून बछडा असल्याचं समजलं. त्यावेळी नाशिकच्या इको एको या संस्थेकडे सोपवण्यात आलं. या बछड्याची प्रकृती अति प्रमाणात बिघडल्यामुळे त्यांनी नाशिकच्या इको एको संस्थेत तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्याने नाशिक वन विभाग आणि इको एको संस्थेने ताब्यात घेतलेले तीन महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू पुण्यातील रेस्क्यू संस्थेकडे सोपवण्यात आलं.
त्यानंतर पुण्यातील रेस्क्यू संस्थेने तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. त्यावेळी पिल्लाची प्रकृती खालावली होती. हिमोग्लोबिन कमी झाल्याने पिल्लाला रक्ताची गरज होती. सुदैवाने त्याच काळात मातेपासून वेगळं झालेलं एक पिल्लू संस्थेत दाखल झालं होतं. दोघांचाही रक्तगट समान होतं. त्यानंतर संस्थेने वनविभागाची परवानगी घेऊन दुसऱ्या पिल्लाचं रक्त आजारी पिल्लाला दिलं. या पिल्लामुळे आणि वेळेवर उपचार मिळाल्याने पिल्लाचा जीव वाचला आता दोन्ही पिल्लं पिंजऱ्यात खेळत असतात, असं संस्थेतील पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. कल्याणी ठाकूर यांनी सांगितलं आहे.
'पहिला प्रयोग फसला होता'
यापूर्वी वाघाला रक्त देण्याचा प्रयोग काही तज्ज्ञांनी केला होता. मात्र त्यांचा या प्रयोग फसला होता. त्यावेळी आजारी वाघाचा काही तासातच मृत्यू झाला होता. यावेळी मात्र बछडा असल्याने आम्ही योग्य काळजी घेत होते. पिल्लाची वाचण्याची शाश्वती फार कमी होती मात्र आम्ही सगळ्यांनी पिल्लाचा जीव कसा वाचवता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं. रक्त दिल्यावर दोन्ही पिल्लांवर आमच्या संस्थेतर्फे लक्ष ठेवलं जात होतं. त्याच्या प्रत्येक हालचालीचं आम्ही निरिक्षण करत होतो. मात्र त्या दोघांमध्येही सकारात्मक बदल दिसून येत होते आजारी असलेलं पिल्लूही ठणठणीत झालं आहे, असं त्या सांगतात.
‘चुटकी’ आणि ‘बुटकी’ बछड्यांची नावं
दोन्ही पिल्लं मादी आहेत. त्यामुळे संस्थेने दोन्ही पिल्लांनी नावं चुटकी आणि बुटकी ठेवले आहे. त्यांच्यावर मागील चार महिन्यापासून प्रयोग सुरु होता. चार महिने झाले दोन्ही पिल्लांची प्रकृती चांगली आहे. या दोन्ही पिल्लांना बाहेर सोडणं शक्य नसल्याने त्यांची काळजी संस्थेमार्फत घेतली जात आहे.