Pune Petgala : काय सांगता! पुण्यात कुत्रे, मांजरी करणार कॅट वॉक अन् फॅशन शो
पुण्यात कुत्र्यांचा आणि मांजरीचा फॅशन शो आणि कॅट वॉक होणार आहे. त्यामुळे पुण्यात आला कुत्रे आणि मांजरीदेखील नटलेले आणि रॅम्पवर अवतरलेले दिसणार आहे.
Pune Petgala : पुणे तिथे काय उणे असं कायम म्हटलं जातं. त्याच पुण्यात प्राणीप्रेमींची संख्या देखील भरपूर प्रमाणात आहे. पुणेकर कुत्र्यांचा आणि मांजरींचा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा करतात. मात्र आता पुण्यात कुत्र्यांचा आणि मांजरीचा फॅशन शो आणि कॅट वॉक होणार आहे. त्यामुळे पुण्यात आता कुत्रे आणि मांजरी नटलेल्या आणि रॅम्पवर अवतरलेल्या दिसणार आहेत. यासाठी अनेक प्राणीप्रेमी पुणेकरांनी आपल्या प्राण्याच्या ग्रुमिंगला सुरुवात केली आहे. पेटगाला या शोमध्ये पाळीव प्राण्यांच्या करामती बघायला मिळणार आहे.
सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. तर याच क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला या पेट शोचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे.
यात प्राणी दत्तक मोहिमेचा देखील समावेश आहे. शक्य तितक्या जास्त मांजरी आणि कुत्र्यांना अशा घरामध्ये प्रदान करायचे जिथे त्यांची विशेष काळजी आणि निगा राखली जाईल, हा उद्देश उराशी बाळगून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. येत्या रविवारी (13 नोव्हेंबर) डेक्कन कॉलेज ग्राऊंडवर पार पडणार आहे.
विविध प्रकारच्या मांजरीचा सहभाग
फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) Whiskas- MARS Petcare या ब्रँडचे, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख, संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षक या कार्यक्रमाचा निकाल जाहीर करतील. श्री. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), श्रीमती जॅन रॉजर्स (यूएसए), मिस्टर फडली फुआद (इंडोनेशिया), मिस्टर इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) हे या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण करणार आहेत. 200 हून अधिक मांजरींचा सहभाग असणार आहे. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि इंडीमाऊ यांसारख्या विविध जातीच्या मांजरींचा समावेश असणार आहे.
प्राणी करणार कॅट वॉक
इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळणार आहे, जसे की डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर खेळ इत्यादी उपक्रम राबवण्यात येतील. पुण्यात प्राणीप्रेमींची काही कमतरता नाही आहे. अनेकांना प्राण्यांची प्रचंड आवड आहे. अनेकांच्या घरात कुत्रा आणि मांजरी बघायला मिळतात. त्यांची काळजी घेणं आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा पुणेकर प्राणीप्रेमी प्रयत्न करत असतात. त्याच्या प्राण्यांना आता कॅटवॉक करण्याची संधी मिळणार आहे.