(Source: Poll of Polls)
Sharad Pawar: मनुस्मृती आणि मनाचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याच्या चर्चा, शरद पवार म्हणाले, मुलांच्या डोक्यात काय घालायचं, पालकांनी विचार करावा
Maharashtra Politics: राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती, भग्वद्गीता आणि मनाचे श्लोक यांच्या समावेशाच्या प्रस्तावावरुन वाद. हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं वक्तव्य.
मुंबई: राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या (Indian Constitution) बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भग्वद्गीता, मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर मानवी मूल्ये आणि स्वभाववृत्ती यांची ओळख करुन देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरण्याची शक्यता आहे.
शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीच्या समावेशाची चर्चा, फडणवीस म्हणाले...
विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृतीमधील श्लोक शिकवण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली होती. या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याता आला. त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटले की, मी असल्या फाल्तू गोष्टींना उत्तर देत नाही. काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरलेले नाहीत. महाराष्ट्रात मनाचे श्लोक वर्षानुवर्षे बोलले जातात, ऐकले जातात. त्यांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण यावरुन विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
एससीईआरटीचा अभ्यासक्रम नेमका कसा असणार?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने तिसरी ते बारावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, अशी शिफारस एससीईआरटीने केली आहे. तर तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI