कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Sangram Jagtap on Rohit Pawar : अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून आमदार रोहित पवारांनी टीका केली होती.

Sangram Jagtap on Rohit Pawar : कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा मार्च महिन्यात होणार आहे. याबाबत पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माहिती दिली होती. तर अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत आमदार रोहित पवारांनी ही कुस्ती स्पर्धा राजकीय लोकांसाठी होती अशी टीका केली होती. यावर नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संग्राम जगताप यांनी म्हटले आहे की, कुस्ती स्पर्धेच्या स्टेजवर कुणाला बोलवायचे हा आयोजकांचा विषय आहे. हा काही बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही. आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. ज्यांनी रोहित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहिले म्हणून रोहित पवार यांना झोंबलं असावं. म्हणून रोहित पवार अशा वल्गना करता आहेत, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला आहे. आता संग्राम जगताप यांच्या टीकेवर रोहित पवार काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
दरम्यान, नुकतीच झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादग्रस्त निकालांमुळे चर्चेत राहिली. महाराष्ट्र केसरी किताबी लढतीसाठी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यादरम्यान कुस्ती झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळला विजयी ठरवले गेल्याने, पंचांच्या निर्णयाविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये राजकारण विरहीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महासंघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण झालं. हे सगळं आपण पाहिलेले आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवून स्पर्धा घेणार आहे. महाराष्ट्र केसरीत जर राजकारण झालं तर यात अनेक जणांचे नुकसान होऊ शकते. आम्ही राजकारण विरहित स्पर्धा पार पाडू, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

