पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
एएसआय राजीव रंजन मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब पाटणा येथे राहते. राजीव रंजन यांना पोलीस लाईन अररिया येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी मृतदेहावर धाय मोकलून रडली.

ASI Rajiv Ranjan : पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. गुन्हेगारही पकडला गेला होता, त्यादरम्यान टीमवर जमावाने हल्ला केला होता, ज्यामध्ये एएसआय राजीव रंजन पडले. राजीव रंजन यांना रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत गावकऱ्यांनी गुन्हेगाराची सुटका केली. हा कोणत्या चित्रपटातील किंवा मालिकेतील प्रसंग नसून वास्तवात घडला आहे. राजीव रंजन यांना जमावाने मारहाण करून जीवे मारल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. अररियामध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये फुलकाहा पोलीस ठाण्यात तैनात एएसआय राजीव रंजन पोलीस पथकासह फुलकाहा मार्केटमध्ये छापा टाकण्यासाठी गेले होते.
पत्नी मृतदेहावर धाय मोकलून रडली
एएसआय राजीव रंजन मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब पाटणा येथे राहते. राजीव रंजन यांना पोलीस लाईन अररिया येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी मृतदेहावर धाय मोकलून रडली. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. ललितकुमार यादव, प्रभूकुमार यादव, प्रमोदकुमार यादव, शंभू यादव, कुंदन यादव आणि लालन यादव अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कुटुंब पाटणा येथे राहते, त्यांना 2 मुली आहेत
एएसआय राजीव रंजन मल ( वय 45) हे कुशवाह समाजातील आहेत. त्यांचे वडील अनिलकुमार मल हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे वडिलोपार्जित घर मुंगेरमधील नया रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जानकीनगर गावातील कुशवाह टोला प्रभाग 4 मध्ये आहे. सध्या त्यांचे कुटुंब पटना येथील बेऊर भागात एका घरात राहतात. राजीव रंजनचा विवाह 2001 मध्ये सुंदरपूर गावातील रुबी देवीसोबत झाला होता. त्यांना राणी रंजन आणि राणू रंजन या दोन मुली आहेत.
मित्र म्हणाला, होळीनंतर घरी येण्याचे वचन दिले होते
राजीव रंजन यांचे मित्र पवन कुमार सिंह म्हणाले की, मी त्यांच्याशी पाच दिवसांपूर्वी बोललो होतो. आम्ही त्यांना होळीच्या दिवशी घरी यायला सांगितले होते. मात्र त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत घरी येण्यास नकार दिला. होळीनंतर घरी येण्याचे बोलले होते. होळीनंतर आपण सर्व मित्र एकत्र येऊन ती साजरी करू, असे वचन त्यांनी दिले होते. राजीव रंजन यांना लहानपणापासूनच पोलिसात भरती होण्याची इच्छा होती. यासाठी ते धावण्याचा सराव करायचे. मी पण त्याच्यासोबत रेस लावायचो. आम्हा दोघांनाही सिलेक्शन आणि जॉब मिळालं. पण काही कारणास्तव मी नोकरी सोडली. तो अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता.
अटकेसाठी छापेमारी सुरूच
दरम्यान, एएसआयच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस छापे टाकत आहेत. एसपी अंजनी कुमार म्हणाले, 'पोलीस पथक गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. तेथेही त्याला पकडण्यात आले, पण त्याच्या साथीदारांनी जमाव जमवून जबरदस्तीने सोडून नेले.
वाँटेड गुन्हेगार अनमोल यादवला पकडण्यासाठी पथक गेले होते
वाँटेड गुन्हेगार अनमोल यादव फुलकाहा मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस सक्रिय झाले. फुलकाहा पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच छापा टाकण्यासाठी फुलकाहा मार्केटमध्ये पोहोचले. पोलिसांनी अनमोल यादवला पकडले होते. मात्र, काही पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगाराची सुटका केली. यावेळी राजीव रंजन पडले. त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.




















