Nashik Hanuman Birth Place : नाशिकची शास्रार्थ सभा वादात, तीन तासानंतरही हनुमान जन्मस्थळ बाजूलाच!
Nashik Hanuman Birth Place : नाशिकची (Nashik) शास्रार्थ सभा वादात सापडली असून तीन तासानंतरही वाद कायम असून उपस्थित साधू महंत हमरी तुमरीवर आल्याचे पाहायला मिळाले.
Nashik Hanuman Birth Place : नाशिक येथे आज सकाळपासून सुरु असलेल्या शास्रार्थ सभा वादात अडकली असून गेल्या तीन तासानपासून सुरु असलेला वाद अद्यापही कायम आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली सभा वादाने रंगली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद वाढत चालला आहे. हा वाद मिटवण्यासाठी नाशिक व कर्नाटक येथेही किष्किंदा नगरीचे साधू महंतांनी शास्रार्थ सभेचे आयोजन केले होते. मात्र सकाळी सभा सुरु होण्यापूर्वीच बंद पडली. या ठिकाणी साधू महंतांकडून बसण्यावरून चांगलाच वाद रंगला. परिणामी काही काळ सभा थांबविण्यात आली. यावर रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य यांनी देखील दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अखेर काही वेळांनंतर सभास्थळी अनेक साधू महंत उपस्थित झाले. साधू महंत, लोक प्रतिनिधी आदींनी उपस्थिती दर्शवत हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी एकत्र सभा सुरु झाली. मात्र सभा सुरु झाल्याच्या काही मिनिटानंतर लगेचच पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आणि वादाला तोंड फुटले. त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूलाच राहून बसण्याचा वादामुळे काही काळ गोंधळ झाला. सभेला उपस्थित असलेल्या गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये मध्ये वाद झाला.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद चांगलाच पेटला आहे. हा वाद सोडविण्यासाठी आज नाशिकरोड येथे शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेपूर्वी सभास्थळी बसण्यावरून साधू महंतांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. हा वाद शमतो न शमतो तोच भर सभेत साधू महंत हमरी तुमरीवर आले. यावेळी उपस्थित महंताने बाजूला असलेला बूम उचलून महाराजांना उगारला. यावेळी गोविदानंद महाराजांनी उभे राहत आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही शांत राहण्यास सांगून सभा पुढे सुरु केली. मात्र वाद वाढतच राहिला. शेवटी सभास्थळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. अखेर हि सभा गुंडाळण्यात आल्याचे प्राथमिक माहिती असून साधू महंतांच्या वादात हनुमान जन्मस्थळ नेमके कुठे हा वाद बाजूलाच राहतो कि काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दाव्यानंतर हा वाद पेटला आहे. गोविदानंद महाराजांनी याबाबत नाशिकच्या साधू महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्या संदर्भात खुले आव्हानही दिले. या आव्हानचा स्वीकार करीत नाशिकच्या साधू महंतांसह गावकरी एकत्र झाले. तसेच या संदर्भात रास्ता रोकोही केला. त्यानंतर आज नाशिकरोड येथे याबाबत महाचर्चेला सर्वजण सहभागी झाले आहेत. पण तोडगा निघण्याआधीच हि सभा गुंडाळण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.