Nashik Leopard : नाशिकमध्ये वर्षभरात बारा बिबट्यांनी जीव गमावला, इगतपुरीच्या बिबट्याला शर्थीने वाचवलं!
Nashik Leopard : नाशिकमध्ये बिबट्याला जीवदान देण्यात वनविभाग आणि डॉक्टरांना मोठं यश आल आहे.
Nashik Leopard : बिबट्याची (Leopard) माहेरघर अशी खरं तर नाशिकची (Nashik) ओळख होऊ पाहात असून दुसरीकडे मात्र बिबट्यांच्या वाढत्या मृत्यूची संख्या ही दिवसेंदिवस चिंताजनक बाब होऊ लागली आहे. अशातच एका दहा वर्षांच्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभाग (Forest) आणि डॉक्टरांना मोठं यश आल आहे. सध्या या बिबट्याला पुढील उपचारासाठी पुण्याचं उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.
नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील तळेगावमध्ये तीनच दिवसांपूर्वी काही नागरिकांना एक भला मोठा बिबट्या नजरेस पडला आणि गावात धावपळ उडाली. जो तो बिबट्याला बघण्यासाठी, त्याचे फोटो काढण्यासाठी घटनास्थळी दाखल होऊ लागला, मात्र हा बिबट्या काहीसा वेगळा होता, त्याची हालचाल मंदावली होती, तो नीट चालूही शकत नव्हता, तसेच त्याला दमही लागत होता आणि हेच बघता नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचं पथक इथे दाखल झालं, त्यांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले, मात्र बिबट्या आजारी असल्याचं बघताच इंजेक्शन दिल्यास तो मृत पावण्याची भिती असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. अखेर शेवटी कुठलेही औषध वगैरे न देता जाळी टाकत मोठ्या हिमतीने वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले होते.
बिबट्या जगला पाहिजे म्हणून बिबट्यावर नाशिकच्या रोपवाटिकेत प्रथमोपचार करण्यात आले आणि त्यानंतर बुधवारी विशेष वाहनातून पुण्यातील बावधनच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात त्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. बिबट्या अंदाजे दहा वर्षांचा नर असून त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असता त्याला संसर्ग झाला होता, पेशी वाढल्याने खूप अशक्तपणा आला होता, दम लागत होता, तसेच पोटाच्या आजारासह पायालाही गंभीर इजा झाल्याचं समोर येताच डॉक्टरांनी मोठी मेहनत घेत त्याच्यावर उपचार सुरु केले. बुधवारी त्याला सलाईन लावत इंजेक्शनही देण्यात आले असता बिबट्याने काही काळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर उठताच चिकनवर ताव मारत दोन किलो चिकन त्याने फस्त केले असून हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत.
नाशिककरांना बिबट्याचे दर्शन होणं ही काही आता नवीन बाब नसली तरी मात्र गेल्या वर्षभरात नाशकात तब्बल बारा बिबट्यांनी आपला जीव गमावला असून यामागे अपघात आणि नैसर्गिक कारणे आहेत. बिबट्यांची संख्या जरी वाढत असल्याचं बघायला मिळत असलं तरी मात्र जगण्यासाठी त्यांना मोठा संघर्षही करावा लागत असून नागरिकांमध्ये देखिल वन्यप्राण्यांबाबत जनजागृती होणं गरजेचं बनलय. सुदैवाने इगतपुरीत दिसलेला हा बिबट्या भूकबळी ठरलेला नसून वनविभाग आणि डॉक्टरांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे त्याला जीवदान मिळाले आहे. थोड्याच दिवसात उपचार पूर्ण होताच या बिबट्याला पिंजऱ्यातून मुक्त करण्यात येईल आणि तो पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेईन..