चांदवडमध्ये ढगफुटी! रस्त्यावर गुडघाभर पाणी, अनेक ठिकाणी घरात शिरलं पाणी, वाहनं जनावरं गेली वाहून
नाशिकच्या (Nashik) चांदवड (Chandwad) शहर व परिसरात परतीच्या पावसानं धुमाकूल घातलाय. चांदवडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.
Nashik Rain News : नाशिकच्या (Nashik) चांदवड (Chandwad) शहर व परिसरात परतीच्या पावसानं धुमाकूल घातलाय. चांदवडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सुमारे दोन तास कोसळत असलेल्या पावसानं शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. रस्त्यावरुन गुडघ्याएवढं पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर आठवडे बाजारातील पांचाळ वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसली आहे, तसेच या भागातील काही जनावरे वाहून गेली आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
काढणीला आलेला मका, कांदा,सोयाबीन पिकाला मोठा फटका
राहूड भागात जोरदार पाऊस झाल्याने राहुडच्या बंधाऱ्याने धोक्याची पातळी गाठल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे, काढणीला आलेला मका, कांदा,सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. चांदवडसह देवळा, कळवण, मनमाड, नांदगाव आदी भागातही जोरदार पाऊस सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामन्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. बाजार समिती विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला तर कुठे शेतात काढणीसाठी आलेले सोययाबीन पिकांचं नुकसान झालं आहे. गेल्या 15 दिवसा पासून ऑक्टोबर हिटने जनता चांगलीच त्रस्त झाली असताना आज बरसलेल्या पावसाने काही प्रमाणात उकाडा कमी झाला आहे.
जालना जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट.
हवामान खात्याचा अंदाजानुसार जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या पासून तीन दिवस म्हणजेच 22 ऑक्टोंबर पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.जोरदार पावसासह 30 ते 40 प्रति तासाप्रमाणे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जालना जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा आव्हान केल आहे. संबंधित यंत्रणांना सज्य राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. शिवाय याबाबत घडणाऱ्या घटनांची माहिती सबंधित विभागास तात्काळ कळवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळं (Rain) झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. तसेच नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.