Manikrao Kokate : सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
Manikrao Kokate : 1995 ते 1997 च्या सालात कमी उत्पन्न दाखवून सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारच्या अनुदानातून घर घेतले होते.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 ते 1997 च्या काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर सुनावण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) याबाबत सुनावणी सुरु होती. आज गुरुवारी (दि. 20) न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांनी शिक्षा ठोठावली आहे. यानंतर सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरातच माणिकराव कोकाटे यांनी व्यवसाय थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
1995 ते 1997 च्या सालात कमी उत्पन्न दाखवून सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारच्या अनुदानातून घर घेतले होते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरच्या परिसरामध्ये निर्माण स्कूल व्ह्यू या ठिकाणी त्यांचे घर आहे. याच घरात माणिकराव कोकाटे यांनी व्यवसाय देखील सुरू केल्याचं दिसून येत आहे.
गिरीश महाजनांच्या हस्ते झाले होते उद्घाटन
दूध डेअरी आणि प्रक्रिया केंद्र माणिकराव कोकाटे यांनी सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरामध्येच सुरू केले होते. सध्या ते बंद अवस्थेत दिसून येत आहे. मात्र या सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरात दूध केंद्र व्यवसायाचे उद्घाटन तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होता. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती. त्याचा निकाल 30 वर्षानंतर आज लागलेला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहे. मी हाय कोर्टात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

