Manikrao Kokate : पाचव्यांदा आमदारकी, अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा, आता 1995 सालचं प्रकरण कृषीमंत्री कोकाटेंच्या अंगलट
Manikrao Kokate : नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Who is Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना 1995 सालचं प्रकरण चांगलंच अंगलट आलं आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे (Tukaram Dighole) यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.
1995 ते 1997 च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमके कोण आहेत माणिकराव कोकाटे...
सिन्नर विधानसभेत पाचव्यांदा आमदार
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छोट्या खेड्यात सोमाठाणे येथे 26 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेल्या कोणताही राजकीय वारसा नसलेले ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना NSUI संघटनेत प्रवेश घेऊन केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली. 2004 मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. नंतर नारायण राणे यांच्या सोबत 2009 मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. 2009 साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित दादा यांच्या गटात गेले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 41 हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले.
अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आश्वासन सिन्नरकरांना दिले होते. अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळत माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी सोपवली. माणिकराव कोकाटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यातच आता कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
