Nanded News : नांदेडच्या बियाणी हत्याकांडातील शूटरला एनआयएने घेतले ताब्यात
Nanded News: विशेष म्हणजे या आरोपीच्या शोधात नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती.
Nanded News: राज्यभरात गाजलेल्या नांदेड जिल्ह्यातील संजय बियाणी हत्याकांडातील शूटरला एनआयएने (NIA) ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल2022 रोजी घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा असून, त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने नेपाळ बॉर्डरवर पकडले आहे. विशेष म्हणजे या आरोपीच्या शोधात नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यात जाऊन आली होती.
नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने बियाणी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु बियाणींवर गोळीबार करणारे दोन शूटर फरार होते. महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटर अटक करण्यात आली होती. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात तो सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. तर मुख्य शूटर असलेला दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता.
नेपाळ बॉर्डरवरुन केली अटक
संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरा महत्वाचा शूटर दीपक सुरेश रांगा फरार झाला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. मात्र अनेक राज्यात शोध घेऊन दीपक पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र बुधवारी (25 जानेवारी) एनआयएच्या पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन त्याला अटक केली आहे. त्यामुळे आता नांदेड पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात, तसेच त्याच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत.
आरोपी दीपक रांगावर विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे
एनआयएने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये 25 गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. रांगा याने पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हेडक्वॉर्टरवर रॉकेट हल्ला केला होता. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे एसआयटीच्या पथकासह मागील काही दिवसांपासून परराज्यात तळ ठोकून होते. मात्र आता दीपक रांगा पकडला गेल्याने खुनामध्ये नेमके कोण? याचा धागा पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढू शकते. आता त्याच्या अटकेमुळे बियाणी हत्येसह इतरही अनेक प्रकरणांचे धागेदोरे यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातमी: