Dhananjay Deshmukh : नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर
Dhananjay Deshmukh : धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा मिळाल्यानंतर रविवारी संतोष देशमुख यांचे भाऊ नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत.

Dhananjay Deshmukh : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे हे गुरुवारी भगवानगडावर (Bhagwangad) दाखल झाले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांची भेट घेतली. यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका जाहीर केली. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे आज रविवारी (दि. 02) भगवानगडावर दाखल होणार आहेत. ते आज नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु ज्या लोकांनी हे प्रकरण केले, हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडिया का दाखवत नाही. त्यांना मारहाण का झाली, हेही दखल घेण्याजोगे आहे. मारहाण झाली तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, असे म्हणत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आरोपींना आधी चापट मारली गेली आणि त्यानंतर हे घडले, त्यामुळे आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते.
धनंजय देशमुख घेणार नामदेव शास्त्रींची भेट
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला होता. धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं की, एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात 10 चापटा त्यांनी मारल्या असत्या तरी चालले असते. मात्र, केवळ एकाच चापटेच्या बदल्यात अशा प्रकारचा भीषण खून करण्यात आला, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली होती. आता धनंजय देशमुख आज दुपारी भगवान गडावर दाखल होणार आहेत. ते नामदेव शास्त्री यांची घेणार भेट आहेत. तसेच नामदेव शास्त्री यांना काही कागदपत्रे आणि पुरावे देखील धनंजय देशमुख देणार आहेत. नामदेव शास्त्री आणि धनंजय देशमुख यांची भेटीत काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
