Nagpur Traffic : नागपुरात रिक्षांबाबत धोरणाचा अभाव, पोलीस 'टार्गेट'मध्ये व्यस्त; प्रवाशांना ना सुरक्षा, ना सुविधा
नागपूर वाहतूक पोलिसांचेही 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शहरात असलेल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या रिक्षांवर नियंत्रणासाठी कुठलेही धोरण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
![Nagpur Traffic : नागपुरात रिक्षांबाबत धोरणाचा अभाव, पोलीस 'टार्गेट'मध्ये व्यस्त; प्रवाशांना ना सुरक्षा, ना सुविधा There is a lack of policy regarding autorickshaws in Nagpur this is being deliberately ignored by the nagpur traffic police Nagpur Traffic : नागपुरात रिक्षांबाबत धोरणाचा अभाव, पोलीस 'टार्गेट'मध्ये व्यस्त; प्रवाशांना ना सुरक्षा, ना सुविधा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/07/e9bb37fa8a7cb4b30c7f3149d198c9691670397366545440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : एकीकडे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोडींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यातच बेशिस्त रिक्षाचालकांमुळेही शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी होत असून याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचेही (Nagpur Police) 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शहरात असलेल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या रिक्षांवर नियंत्रणासाठी कुठलेही धोरण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील व्हेरायटी चौक, झांशीराणी चौक, जनता चौक यासह सक्करदरा चौक, दिघोरी चौकातही सारखीच स्थिती आहे.
सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात संत्रनगरीची आगेकूच सुरु आहे. मेट्रो धावू लागली आहे, इलेक्ट्रिक सिटी बसेस सुरु झाल्या असून त्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. मात्र, प्रवासी वाहतुकीचं पारंपरिक साधन असलेल्या रिक्षांच्या व्यवस्थेत कोणताही बदल झालेला नाही. आजही शहरातील चौकाचौकात रिक्षा मोठ्या संख्येने उभ्या दिसतात. रिक्षांबाबत सरकारचे निश्चित धोरणच नसल्याने सारेच अस्तव्यस्त आहे. याच दुर्लक्षित कारभारामुळे सुरक्षेची हमी किंवा सुविधाही प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. आता ई-रिक्षांमुळे अस्ताव्यस्ततेत आणखीच भर पडली आहे.
मनमानी थांबे, अर्धा रस्ता व्यापून उभे राहतात रिक्षा
रिक्षाकडे परिवहन विभागाने (RTO) कमालीचे दुर्लक्ष केले आहे. शहरातील प्रमुख चौकांमधील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावरुन ते अधोरेखितही होते. हव्या तिथे रिक्षा उभ्या केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी तर रिक्षांमुळे अर्धा रस्ता व्यापल्याचे दिसते. मोठी वाहनेही उर्वरित भागातूनच काढावी लागतात. सीताबर्डी चौक, लॉ कॉलेज चौक, रविनगर, शंकरनगर, झाशी राणी चौक, मुंजे चौक, जनता चौक, रहाटे कॉलनी चौक, छत्रपती चौक, कॉटन मार्केट चौक, रेल्वे स्टेशनच्या दोन्ही टोकाला, एलआयसी चौक, सदर, अग्रसेन चौक, गोळीबार चौक, मेयो हॉस्पिटल, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, नंगा पुतळा चौकासह अन्य ठिकाणी हेच दृश्य दिसते.
मीटर नावापुरतेच
शहरातील रिक्षांसाठी नव्याने मीटर भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ऑटोरिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. पण, महिनाभराहून अधिकचा काळ लोटूनही कॅलिब्रेशन करण्यात आलेल्या रिक्षांची संख्या 800 च्या पलिकडे जाऊ शकली नाही. त्यापेक्षाही अनेक रिक्षांना मीटर असते पण ते सुरु आहे की बंद त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. मागणी करुनही अनेक रिक्षाचालक मीटर सुरुच करत नाहीत. मीटरपेक्षा भाडे ठरवून वाहतूक करण्यावर त्यांचा भर असतो. मीटर नावापुरतेच असते. रिक्षात अधिकाधिक तीनच प्रवासी असावेत असा नियम असला तरी एकाचवेळी त्याहून अधिक प्रवाशांना बसवून नेले जात असल्याचे दिसते.
पारदर्शकता वाढावी
- प्रत्येक रिक्षावर चालकाचा परवाना आणि परमिटचा फोटो असावा.
- बसेसमध्ये भाड्याची यादी लावली जाते, त्याचप्रमाणे रिक्षांमध्येही ती असावी.
- रिक्षांमध्येही जीपीएस अनिवार्य करण्यात यावे.
- प्रत्येक चौकाचौकात रेलिंग बसवून रिक्षा स्टॉप बनवावेत.
ही बातमी देखील वाचा
Nagpur ZP : जिल्हा परिषदेचा अजब कारभार, एका मिनिटांत 27 विषय मंजूर; प्रोसिडिंग रद्द करण्यासाठी विरोधकांची आयुक्तांकडे धाव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)