Nagpur ZP : जिल्हा परिषदेचा अजब कारभार, एका मिनिटांत 27 विषय मंजूर; प्रोसिडिंग रद्द करण्यासाठी विरोधकांची आयुक्तांकडे धाव
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील कामांना जि.पच्या सभेत मंजुरी देणे हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याच्या आरोप विरोधी पक्षाने निवेदनात केला आहे.
Nagpur News : जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP) सर्वसाधारण सभेत नवनियुक्त अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी सभागृहात विषय चर्चेला न घेताच विषयसूचीवरील 27 विषयांना मंजुरी दिली, असा आरोप विरोधीपक्ष भाजपा (BJP) सदस्यांसह काँग्रेस (Congress) बंडखोरांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. पाच डिसेंबरला झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी निवेदनाद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी म्हटले की, मुक्ता कोकड्डे यांनी विषयसूचींवरील विषयांचे वाचन करायला हवे होते. मात्र, त्यांनी एककल्ली काम करत एक ते दहा विषय मंजूर करत सभा संपवली.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Elections) आचारसंहिता सुरु आहे. त्या ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील कामांना मंजुरी देणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. अशा अनेक कामांना मंजुरी दिली आहे. अध्यक्षा अनेक कामे नियमबाह्य करत आहेत. त्यांच्यावर जिल्हा परिषद संहिता आणि लोकसेवक अधिनियमानुसार कार्यवाही करावी तसेच या सर्वसाधारण सभेतील सर्व विषय रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. निवेदनावर उपनेते व्यंकट कारेमोरे, सतीश डोंगरे, सुभाष गुजरकर, नाना कंभाले, संजय झंडे, राधा अग्रवाल, मीनाक्षी सरोदे, नीता वलके, पुष्पा चाफले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कुंदा राऊतांवर रोख
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष यांच्या मतदारसंघातील बोखारा येथे शिवटेकडी मंदिराच्या बांधकामाच्या एक कोटी 35 लाख 35 हजार 270 रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. याठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक असतानाही कामांना मंजुरी मिळत आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रशासकीय मान्यतांचे विषय तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे.
सर्वसाधारण सभेत झाला होता गोंधळ
नागपूर जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या सभापतींनी कार्यभार सांभाळल्यानंतर सोमवारी, आयोजित पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरली होती. सर्वसाधारण सभेच्या ठरलेल्या विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करताच ते मंजूर केल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील साहित्याची आणि कागदपत्रांची फेकाफेक करत बाकांचीही तोडफोड केली. या गोंधळात मुख्य विरोधी पक्ष (BJP) असलेल्या भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे (Congress) बंडखोर नाना कंभालेंचीही साथ मिळाली होती.
ही बातमी देखील वाचा