(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप-शिवसेना संघर्ष दिल्लीत पोहोचला! BJP शिष्टमंडळ गृहसचिवांना भेटून शिवसैनिकांच्या हल्ल्याची तक्रार करणार
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे.
Shiv Sena Vs BJP : राज्यात सुरु असलेला भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष आज दिल्लीत पोहोचला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता हे शिष्टमंडळ भल्ला यांना भेटणार आहे. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट मिळणार का याकडेही लक्ष लागलं आहे. या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे , आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.
किरीट सोमैया मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपा चे शिष्टमंडळ दिल्ली साठी मुंबई हून रवाना, आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आणि किरीट सोमैया.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 25, 2022
नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना भेटणार.@BJP4Maharashtra pic.twitter.com/Y5CkefR6iN
किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, भाजपचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस स्टेशनच्या आवारात हल्ला केला जातो. या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड- किरीट सोमय्या
किरीट सोमय्या यांनी काल आरोप करताना म्हटलं होतं की, खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला होता. एवढंच नाहीतर किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचा खळबळजनक दावाही किरीट सोमय्यांनी केला होता. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला. काल सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितलं आहे,असंही सोमय्यांनी सांगितलं होतं.