Lalbaugcha Raja Auction 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण वस्तूंचा लिलाव संपन्न, कोणकोणत्या वस्तूंची विक्री?
Lalbaugcha Raja Auction 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव काल करण्यात आला. लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव एकूण एक कोटी तीस लाख रुपयांना झाला.
Lalbaugcha Raja Auction 2022 : मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव गुरुवारी (15 सप्टेंबर) करण्यात आला. लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव एकूण एक कोटी तीस लाख रुपयांना झाला. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले होते. त्यात सोन्या चांदीच्या वस्तूंसहसह एक हिरो होंडाची बाईक देखील दान करण्यात आली होती.
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव गुरुवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडला. लालबागच्या राजाच्या अर्पण केलेल्या साहित्याच्या लिलावासाठी 200 भक्तांनी हजेरी लावली आणि वस्तू विकत घेतल्या. या लिलावात सोन्याचा मोदक सव्वा किलोचा होता, त्यासाठी 60 लाख 3 हजार रुपयांची बोली लावत एका महिलेने घेतला. हार साडे सतरा तोळ्याचा होता, साडे आठ लाख रुपये किमतीला एका भक्ताने तो विकत घेतला. तसेच एक दुचाकी होती ती 66 हजार बोली लावून एका भक्ताने विकत घेतली.
यंदा 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश होता. यातील आकर्षण म्हणजे एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला होता ती. याशिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट, एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव करण्यात आला.
अशाप्रकारे सर्वच साहित्यांचे एकूण रक्कम एक कोटी तीस लाख रुपयांचा लिलाव झाल्याची माहिती लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी फोनवरुन संवाद साधत दिली.
गणेशोत्सवानंतर मंडळाकडून दान केलेल्या वस्तूंचा लिलाव
लालबागच्या राजाची 'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात. मुंबईतील गणेशोत्सवाचं संपूर्ण जगभरात आकर्षण आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे बाप्पाच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोखरक्कम, दागिने असं दान भक्तांकडून देण्यात येतं. दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. गणेशोत्सवानंतर मंडळाकडून दान केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. सोने, चांदी, रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात. मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हाताने दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेने काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या