परिषद नाट्याचा आज दुसरा अंक!
प्रसाद कांबळी विरुद्ध नियामक मंडळ सदस्य यांच्यातील वादाचा आज दुसरा अंक दुपारी दोन वाजल्यापासून यशवंत संकुलात रंगणार आहे. पुढे हे नाट्य कसं वळण घेतं ते पाहाणं कुतुहलाचं ठरणार आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अखिल भारतीय नाट्यपरिषदेमध्ये अंतर्गत वाद उद्भवले आहेत. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या कार्यपद्धतीवर परिषदेच्याच नियामक मंडळातील सदस्यांनी नाराजी नोंदवली आहे. याबाबत नियामक मंडळातल्या 40 सदस्यांनी लेखी पत्रही नाट्यपरिषदेला दिलं. त्यावर दोन दिवसांपूर्वी प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आता आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता यशवंत नाट्यसंकुल इथे नियामक मंडळाने सभा बोलवली असून त्यात परिषद नाट्याचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामाची पद्धत सांगितली. गेल्या अनेक वर्षातले आर्थिक गैरव्यवहार त्यांनी कथन केले. शिवाय, याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं म्हटलं आहे. यात माजी अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, विश्वस्त शशी प्रभू यांच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा कांबळी यांनी मांडला. यशवंत नाट्यसंकुलास अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसूनही संकुलाला आग लागल्यानंतर इन्शुरन्स मिळणे, नूतनीकरणानंतरही पुन्हा एकदा सरकारकडे 75 लाखांचा निधी मागणे आदी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपण करत असलेलं काम हे घटनेनुसार आहे यावर ते ठाम आहेत.
ही गोष्ट एकिकडे असताना, नियामक मंडळाने गुरूवारी विशेष सभेचं आयोजन केलं आहे. प्रसाद कांबळी यांनी आज होणाऱ्या बैठकीस कोर्टात जाऊन स्टे मागितला होता. परंतु, कोर्टाने ही बैठक घेण्यास हरकत घेतलेली नाही. त्यानुसार ही बैठक आज होते आहे. या विशेष सभेत नियामक मंडळ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकूण 64 नियामक मंडळ सदस्यांपैकी 40 जणांनी कांबळी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कांबळी यांना बहुमत सिद्ध करावं लागू शकतं. पण त्याचवेळी ही बैठकच अवैध असल्याचा दावा कांबळी यांनी केला आहे. घटनेनुसार विश्वस्तांचा राजीनामा कोणाही सदस्याला मागता येत नाही. परिषदेचे अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह हे विश्वस्त असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं कांबळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
त्यामुळे प्रसाद कांबळी विरुद्ध नियामक मंडळ सदस्य यांच्यातील वादाचा आज दुसरा अंक दुपारी दोन वाजल्यापासून यशवंत संकुलात रंगणार आहे. पुढे हे नाट्य कसं वळण घेतं ते पाहाणं कुतुहलाचं ठरणार आहे.