तोट्यातील बेस्टचा तुटीचा अर्थथसंकल्प सादर, परिवहन विभागासोबतच बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात
परिवहन विभागाची अंदाजे तूट 1624.24 कोटी इतकी आहे. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात बेस्टचा व्यवहार तोट्यातच चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमाचा तुटीचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. यंदा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असला तरी भविष्यात बेस्ट उपक्रमाची गाडी रुळावर आणण्यासह प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणारा आशादायी ठरणाऱ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
बेस्ट उपक्रमाचा सन 2021-22 या वर्षाकरताचा अंदाजित अर्थसंकल्पही 1,887.83 कोटी तुटीचा मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांचा फायदा करून देणारा बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात गेला असून ही तूट 263.59 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. तर परिवहन विभागाची अंदाजे तूट 1624.24 कोटी इतकी आहे. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात बेस्टचा व्यवहार तोट्यातच चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या अर्थसंकल्पीय वर्षात विद्युत विभागाचे उत्पन्न 3532.30 कोटी तर खर्च 3795.89 कोटी इतका होणार आहे. त्यामुळे वीज विभागाची निव्वळ तूट 263.59 कोटी येणार आहे. तर परिवहन विभागाचे उत्पन्न 1407.00 कोटी अंदाजिले आहे तर खर्च 3031.24 कोटी इतका होणार आहे. त्यामुळे निव्वळ तोटा 1624.24 कोटी इतका होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक वीजमापकांची पुनःस्थापना
गेल्या 2 वर्षामध्ये मोठया प्रमाणामध्ये पारंपारीक पध्दतीची सुमारे 2 लाख वोजमापके बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक पध्दतीची वीजमापके बसवण्यात येतील असे अर्थसंल्पात म्हटले आहे.
बस ताफ्यात होणार वाढ
ऑक्टोबर 2020 मध्ये बेस्ट उपक्रमाकडे 3875 बसगाड्यांचा ताफा आहे. ज्यामध्ये 1099 भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे . या व्यतिरीक्त 300 विद्युत बसगाड्यांचा खरेदी आदेश देण्यात आला आहे . तसेच 600 एकमजली सीएनजी बसगाड्यांकरीता निविदा प्रक्रिया कार्यरत आहे. पहिल्या टप्प्यात उपक्रमाचा एकूण बसताफा 31 मार्च 2022 पर्यंत 6337 इतका करण्याचे प्रस्तावित आहे.
त्याच प्रमाणे बसस्थानकांवर प्रवासी माहिती प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध मिळून एकूण 800 ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली अंतर्गत प्रवाश्यांना उपक्रमाच्या बससेवेची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये बसगाडीची बसथांब्यावर येणारी अपेक्षित वेळ प्रवाशाला समजू शकेल तसेच भारत सरकारने देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्राकरिता ' नॅशनल कॉमन मोबीलिटी कार्ड ( NCMC ) एक राष्ट्र - एक कार्ड हो योजना राबविण्याचे ठरविलेले आहे. सदर कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्राला लागू असेल. उदा . रेल्वे , बसेस , मोनोरेल, मेट्रोरेल व बेस्ट उपक्रम देखिल या योजनेत सहभागी असल्याकारणाने , प्रायोगिक तत्वावर ही योजना कुलाबा व वडाळा आगारात ऑक्टोबर, 2020 पासून राबविण्यात आली आहे, असेही बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.
Unlock 5.0 | बेस्ट, एसटी बसमधून गर्दीतून प्रवास,सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; मग लोकलमधून प्रवास का नको?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
