Nilam Shinde Accident : अमेरिकेत मुलीची मृत्यूशी झुंज! मंत्र्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या बापाला 14 दिवसांनी मिळाला व्हिसा, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
Nilam Shinde Accident : सातारा येथील रहिवासी असलेल्या आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मास्टर्सचे शिक्षण घेणाऱ्या नीलम शिंदे यांचा 14 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता.

Nilam Shinde Accident : सातारा येथील रहिवासी असलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मास्टर्सचे शिक्षण घेत असलेल्या नीलम शिंदे (Nilam Shinde) यांचा 14 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. या अपघातात नीलमच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. नीलमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या दोन्ही पायांमधून अतिरक्तस्राव झाला आहे. अपघातानंतर नीलम शिंदे ही कोमात आहे. नीलमवर कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. अमेरिकेतील (America) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या लेकीला पाहण्यासाठी बापाला मंत्र्यांच्या बंगल्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. आता नीलमच्या वडिलांना 14 दिवसांनी अमेरिकेचा व्हिसा (America Visa) मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सातारा येथे राहणारे नीलमचे वडील तानाजी यांना 16 फेब्रुवारी रोजी मुलीच्या अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्यांना अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात प्रवेशही दिला गेला नाही. त्यानंतर त्यांना व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाइन स्लॉट तयार करून प्रोफाईल बुक करावे लागते, अशी माहिती मिळाली होती. ऑनलाइन माध्यमातून स्टॉल बुक करण्यासाठी आठवडाभर प्रयत्न करूनदेखील त्यांना ऑनलाइन स्टॉल मिळू शकला नाही. यामुळे नीलमच्या वडिलांनी निराशा व्यक्त केली होती.
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, शिंदे कुटुंबियांना मिळाला व्हिसा
दरम्यान, ही माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आली. सरकारच्या मध्यस्थीनंतर आज कुटुंबीयांना अमेरिकन वाणिज्य दूतावासात भेटीची वेळ मिळाली आणि त्यांना 14 दिवसांनी अमेरिकेचा व्हिसादेखील मिळाला आहे. वडील तानाजी शिंदे यांनी म्हटले आहे की, जेव्हा त्यांना विमानाचे तिकीट मिळेल तेव्हा ते अमेरिकेला रवाना होतील, सध्या त्यांची मुलगी आयसीयूमध्ये असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नीलमच्या वडिलांची सरकारला विनंती
तर नीलमचा चुलत भाऊ गौरव कदम म्हणाला की, मीडियाने आमची भूमिका घेतली नसती तर कदाचित आम्हाला व्हिसा इतक्या सहजासहजी मिळाला नसता. नीलमचे वडील तानाजी यांनी सरकारला विनंती केली आहे की, अशी आपत्कालीन परिस्थिती कुणावरही येऊ शकते आणि त्यांना व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा























