(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : 138 वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या चकलांब्यात गावकऱ्यांनी केला 'चांदणे शिंपित जा' नाटकाचा प्रयोग
Beed : चकलांब्यात 'चांदणे शिंपित जा' हे तीन अंकी सामाजिक विषयावर भाष्य करणारं नाटक सादर करण्यात आलं आहे.
Beed : कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी चैत्र पौर्णिमेला चकलांबा येथे श्री रोकडेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सवानिमित्त पौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध लेखक मधुसूदन कालेलकर लिखित 'चांदणे शिंपित जा' हे तीन अंकी सामाजिक विषयावर भाष्य करणारं नाटक सादर करण्यात आलं. गावातील नागरिक नाटक बसवतात आणि याच नाट्य वेड्या कलावंतांचा अभिनय बघायला पंचक्रोशीतील लोक जमा झाले होते. मागच्या 138 वर्षाच्या इतिहासात फक्त दोन वर्ष कोरोना काळात ही नाट्य परंपरा खंडित झाली होती.
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा चकलांबा येथील श्री रोकडेश्वर उत्सव व नाट्य परंपरेला कोरोना महामारीमुळे खंड पडला होता. चकलांबा हे बीड जिल्ह्यातील एक गाव. जेथे ऐतिहासिक मंदीरे,वाडे , इमारती आहेत. चकलांबा हे चमत्कारिक गावाचे नाव बीड जिल्ह्यात गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावच्या प्राचिनत्वाची प्रचिती पदोपदी येते. हे गाव नाट्य परंपरेचा 138 वर्षापासून वारसा जपलेले दुर्मिळ गाव आहे.
गावात सर्वात जुने असे रोकडेश्वर मंदिर हे एक उंच गढीवजा उंचवट्यावर बांधलेले आढळते. या मंदिरात हनुमानाची मूर्ती आहे. लोकांच्या हाकेला रोकड पावणारा म्हणून भाविक लोक त्याला रोकडेश्वर म्हणतात.
रंगमंदिरा सारखं सेट उभारणी करून नाटक सादर करण्याचा सोहळा आजतागायत चालू
दरवर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेला चकलांबा येथे तीन दिवस उत्सव चालतो. भक्तांना उत्सवाची ओढ वर्षभर असते. गावातून नोकरी-धंद्यासाठी बाहेर गेलेले गावकरी, दुरदूरचे पाहुणे-राऊळे सर्व जण तेव्हा गावात येतात. चैत्र शुद्ध चतुर्थीला रात्री दिमाखदार छबिना पालखी सोहळा संपन्न होतो. पौर्णिमेला सकाळी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री रोकडेश्वर (हनुमान) जन्म फुले उधळून होतो. दुपारी महाआरती , महापंगत, प्रसाद व रात्री 'रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ,नाटक सादर करते. भव्य अशा रंगमंचावर ते सादर होते. पुणे, औरंगाबादसारख्या ठिकाणी असलेल्या रंगमंदिरा सारखे सेट उभारणी करून नाटक सादर करण्याचा सोहळा आजतागायत चालू आहे. गावच्या पंचक्रोशीतील व दुरदूरहून आलेले हजारो लोक नाटकाच्या पर्वणीचा लाभ दरवर्षी लुटतात.
या गावात हनुमान जयंतीला साधारणतः 1885 ते 1890 पासून नाट्य परंपरा चालू आहे. संगीत नाटक सुरू करणारे अण्णासाहेब किर्लोस्कर, तृतीय रत्न नाटक लिहिणारे महात्मा फुले याच वेळेस चकलांबा येथे नाट्य चळवळ सुरू झाली होती. ही ऐतिहासिक परंपरा पहिल्यांदा सुरू करणाऱ्या काही व्यक्तीचे दुर्मिळ छायाचित्रे, दस्तऐवज, संगीत वाद्ये,नाटकांची नावे आजही चकलांबा येथे पहावयास मिळतात.
श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाने तीन टप्प्यात नाटके सादर केली आहेत. निजामशाही राजवटीतदेखील या नाट्य मंडळाने पहिल्या 1890 ते 1950 या साठ वर्षात संत दामाजी, राजा हरीचंद्र , राजा शिवाजी, देव दिनघारी धावला, रुख्मिनी स्वयंवर,संत सखु,हिरा हरपला,संगीत एकच प्याला,संशय कल्लोळ इ. ऐतिहासि, संगीत नाटकं सादर केली. अशा प्रकारची नाटकं सादर करून लोकचळवळ व सामाजिक संदेश देण्याचे महत कार्य केले. या टप्प्यातील सर्व कलावंत स्वर्गवासी झाले आहेत. परंतु त्यांच्या भूमिका आजही ग्रामस्थांच्या कायम आठवणीत आहेत.
देश स्वातंत्र्यानंतर दुसरा टप्पा 1950 ते 1980 मधील काळात या नाट्य मंडळाने माझी जमीन, बाळ चिल्या, सिंहाचा छावा, फिर्याद, स्वर्गावर स्वारी, संत कान्होपात्रा इ. पौराणिक, सामाजिक ,
सांस्कृतिक नाटकं सादर केली. 1980 ते 2010 या टप्प्यात संत तुकाराम, तुज आहे तुजपाशी,वेगळं व्हायचय मला, वाहतो ही दुर्वांची जुडी, विषारी नाग,वरदान, रक्ताचं नातं, सौभाग्य तुझ्या ललाटी, वरचा मजला रिकामा, मोरूची मावशी यासारखी विनोदी,फार्सीकल नाटकं सादर करून लोकं नाटकाला खिळवून ठेवली.
सध्याच्या गतिमान जगात ही नाट्य मंडळ मागे नाहीत. 2010 नंतर रोकडेश्वर मंदिरामागे पूर्वीच्या सुलाखे परिवाराच्या भंडरवाडा जागी आता स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विकास निधीतून व लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी भव्य रंगमंच उभा केला.या रंगमंचावर आताच्या कलाकारांनी अंमलदार, सौजन्याची ऐशी तैशी, माझा कुणा म्हणू मी,डार्लिंग डार्लिंग ही वाट दूर जाते, मी उभा आहे. अशी एकापेक्षा एक सुंदर नाटकं सादर करून चकलांबा गावची नाट्य परंपरा कायम ठेवली आहे.
संबंधित बातम्या