The Clap : मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक नाटक... 'द क्लॅप'
Charlie Chaplin133th Birth Anniversary : 'द क्लॅप' या नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चार्लिच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्ससारखाच या नाटकालाही कृष्णधवल फील देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे: जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चाप्लिनचा आज 133 वा जन्मदिन. चार्ली चाप्लिनच्या जन्मदिनानिमित्त पुण्यातील 'मिलाप' या नाट्य संस्थेने मराठी भाषेतलं पहिलं दोन अंकी कृष्णधवल प्रायोगिक नाटक सादर केले आहे. 'द क्लॅप!'
जागतिक सिनेमातला एक अढळ तारा म्हणून चार्ली चॅप्लिनला आजही ओळखले जाते. चार्ली चॅप्लिनने आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एका नव्या युगाची, वास्तववादाची सुरुवात केली. चार्ली चॅप्लिनने स्वत:ची स्वंतत्र अभिनय शैली निर्माण केली. ज्यामुळे इतक्या वर्षांनंतर आजही तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
'द क्लॅप' या नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चार्लिच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्ससारखाच या नाटकालाही कृष्णधवल फील देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची वेशभूषा आणि नेपथ्य ही विशेष आकर्षणाची गोष्ट आहे. चार्लीचा ऑरा तयार करण्यासाठी तशाच पद्धतीचे वेशभुषा, रंगभूषा आणि नेपथ्य करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न मराठी रंगभूमीवर प्रथमच केला गेला आहे असं म्हटलं जातंय. एक वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर हे नाटक आणलं गेले आहे.
विशेष म्हणजे या नाटकात काम करणारे कलाकार हे वेगवेगळ्या शहरातून एकत्र आले आहेत. पुण्यातून राहुल मुडलगे हा अभिनेता आपल्याला या नाटकातून बघायला मिळणार आहे. या नाटकात राहुल मुडलगे सिडने चॅप्लिन ही भूमिका पार पाडत आहे. मराठी नाटक केल्यानंतर राहुलला वेस्टर्न थिएटर करताना पाहायला मिळत आहे. सांगलीतून पायल पांडे-लिटा चॅप्लिन, मुंबईची सायली बांदकर-ऊना चॅप्लिन, गोव्याचा वर्धन कामत- ऑफिसर लेवी विल्सन, पुण्याची सानिका पुणतांबेकर-बेबी जेन चॅप्लिन, साताऱ्याचा नील केळकर-एरीक अशा भूमिका करत आहेत. डॉ. निलेश माने, स्वप्नील पंडित, नीरज कलढोणे यांनी 'द क्लॅप'चं लेखन केलं आहे. तर वेशभूषा श्रुतिका वसवे यांनी केली आहे.
आपल्या चेहऱ्यावर हास्य असणारा, अभिनयातून अपार करुणा व्यक्त करणाऱ्या चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यातील वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर आजवर विविध भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. या सर्व पुस्तकांच्या पलिकडली चार्ली चॅप्लिनची बाजू, त्याच्या जीवनात आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांवर पडणारे प्रभाव, त्याच्या आयुष्यातील अनेक घडामोडींवर 'द क्लॅप' हे नाटक भाष्य करत आहे.