Shiv Sena MP Sanjay Raut : "जो होगा वो देखा जायेगा"; संजय राऊतांनी दंड थोपटले; म्हणाले, "अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव"
Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : महाराष्ट्रात (Maharashtra) पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.
...कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जातोय. ब्लॅकमेलिंगही होतंय. पण ठिक आहे. जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावं लागतं. मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेयत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचं पाहिलं नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या."
कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ : संजय राऊत
"लढाई कोणतीही असू द्यात. चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितलं. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरु आहेत. जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. अखंड महाराष्ट्र तोडायचा, असं आम्ही नाही, तर भाजपचे नेते सांगतात. जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे असतील तर आधी अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेचे तुकडे करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागले आहेत. त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो.", असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "माध्यमांमध्ये संजय बंडू जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण काल स्वतः संजय बंडू जाधव माझ्यासोबत होते. आताही फोन आला, ते अस्वस्थ आहेत, कारण माझं नाव वारंवार का घेतलं जात आहे? हा प्रश्न त्यांना पडला आहे. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी खासदारकी आणि आमदारकीसाठी पक्षात नाही. मी एका निष्ठेनं, श्रद्धेनं आणि विचारानं या पक्षात आहे. असे अनेक खासदार आहेत, ज्यांना अमिषं, धाक दाखवला असेल. त्यामुळे त्यांनी जाण्याचा विचार केला असेल, जोपर्यंत ते अधिकृतपणे जात नाहीत, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. ते गेल्यावर ते का गेले? हे सांगायला आम्ही मोकळे राहू."