Samruddhi Highway: फेब्रुवारी, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी
समुपदेशन करतांना वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र रस्त्याच्या कडेला विश्रांतीची सुविधा मिळावी ही एकच मागणी प्रामुख्याने वाहन चालकांकडून होत आहे
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्यात आले. तसेच जनजागृती आणि उपाययोजन करण्यात आहेत. परिणामी महामार्गावर फेब्रुवारी, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.
समृद्धी महामार्गावर सतत दोन ते तीन तास विनाथांबा वाहन चालविल्याने चालकाला संमोहित झाल्यासारखे वाटून बहुतांश अपघात घडत असल्याचे निदान उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. हे अपघात रोखण्यासाठी चोवीस तास प्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात असून चालकांचे समुपदेशन सुद्धा करण्यात येत आहे तर समृद्धीवर प्रवास करतांना वाहन चालकांना विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे
समुपदेशन करतांना वाहन चालकांचा चांगलां प्रतिसाद मिळत आहे. मात्र रस्त्याच्या कडेला विश्रांतीची सुविधा मिळावी ही एकच मागणी प्रामुख्याने वाहन चालकांकडून होत आहे. महामार्गावर 'ओव्हर स्पीड' म्हणजेच मर्यादेपेक्षा अधिक वेगाने चालणारे वाहन टोल नाक्यावर येताच एक सायरन वाजतो आणी लगेच अधिकाऱ्यांतर्फे त्या वाहनावर कारवाई करून चालकाचे समुपदेशन करण्यात येते.
प्रवाशांच्या माागण्या
- परिवहन विभागातील अधिका-यांना नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकाचे समुपदेशन करण्याकरता मुख्य रस्त्यावर जागा नाही. रस्त्यावर उभे राहून भरधाव येणा-या वाहन चालकांचे समुपदेशन करणे जोखमीचे आहे. त्याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रत्येक इंटरचेर्जचे ठिकाणी इन टोलवर समुपदेशनाकरता अधिका-यांना पक्क्या स्वरुपात दालन तयार करून दयावे.
- महामार्गावर वाहन चालक व प्रवाशांकरता विश्रांतीची जागा नाही, प्रसाधन गृह नाही, खाण्यासाठी हॉटेल नाही. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी रस्त्यावर वाहन बाजूला घेऊन विश्रांती घेतात, जेवण करतात यांमुळे अपघात होत असल्याने त्याकरता आवश्यक ती उपाययोजना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तातडीने करावी
- वेग मर्यादा फलक, टोल फ्री क्रमांक वाहन चालकांना दिसून येत नाही. तसेच त्यामधील अंतर अधिक प्रमाणात आहे. याकरता रस्त्यावर आडव्या स्वरुपात ठिकठिकाणी वेग मर्यादा आणि टोल फ्री क्रमांक / वाहनांची लेन दर्शवणारे फलक लिखित स्वरुपात तसेच डिजीटल स्वरुपात बसवण्यात यावे
- रस्ता सुरक्षा विषयक सर्व साधारण माहिती देणारे फलक मोठ्या अक्षरात लिखित व डिजीटल बोर्ड बसविणे आवश्यक आहे..
- टोल बुथवर कार्यरत असणा-या कंपनीचे कर्मचा-यांनी वाहन टोलबूथवरुन जाण्यापूर्वी वाहनामध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या असल्यास त्यांना टोलवरुन पुढे जाऊ देण्याची परवनागी देऊ नये. तसेच वाहन चालकाने सिट बेल्ट घातला नसल्यास अशा वाहन चालकांस पुढे जाण्याची परवानगी देऊ नये.
- अपघात झाल्यानंतर टोल फ्री क्रमांकावरून अपघाताबाबतचा संदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी स्थापित केलेल्या यांनी औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षात जातो. त्यानंतर तो संदेश संबंधित इंटरचेंज यांना नियंत्रण कक्षाकडून देण्यात येतो. यामध्ये कालाव्यपय होतो. परिणामी अपघात व्यवस्था तातडीने मदत मिळण्यास विलंब जातो.
- अपघाताची माहिती जवळच्या इंटरचेंज येथील कर्मचा-यांना तात्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी.. तसेच ती सुविधा 108 या टोल क्रमांकावर उपलब्ध करून देता येईल किंवा कसे याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी आवश्यक कार्यवाही करावी..