Sanjay Raut : आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील, निवडणुकीत चुरस नाही : संजय राऊत
राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं.
Sanjay Raut : विरोधकांकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आमच्या ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील आणि आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत कोणीही नाराज नसल्याचे ते म्हणाले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नाही. या लोकशाहील नवीन कोणी मालक निर्माण झालं आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. याबाबत न्यायदेवता त्यांना न्याय देईल अशी आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीत चुरस हा भ्रम
आज सांयकाळी सात वाजता राज्यसभा निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असे राऊत म्हणाले. यामध्ये दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे ते म्हणाले. हे उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होती. भाजपचे सुद्धा दोन उमेदवार विजयी होतील असे राऊत म्हणाले. कालपासून काँटे की टक्कर असल्याचे वातावरण निर्माण केलं जातंय, हे चुकीचं आहे. राज्यात एक भ्रम निर्माण केला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात हे आकडे आपल्याला स्पष्ट दिसतील असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांच्याशी चर्चा
बैठकीत ठरलेल्या गणितानुसारचं प्रत्येकाला मतं मिळतील. आमचे चारही उमेदवार विजयी होतील. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. आताच माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली, तसेच काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा केल्याचे राऊत यांनी सांगितलं. एमआयएमचा आम्हाला विरोध असू शकेल. आमच्या भूमिकेमुळं त्यांचा विरोध आहे. त्यांच्याशी आमचे मतभेद आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाशी त्यांचे काही विषयावर जुळले असले तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही असेही राऊत म्हणाले.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदानाला आज सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सातवा उमेदवार दिल्यानं भाजप आणि महाविकासआघाडी साठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने परवानगी दिली तर कोटा हा 42 चा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: