'औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या', प्रकाश आंबेडकरांचे ट्वीट चर्चेचा विषय; म्हणाले, RSS- भाजपा पुढची...
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलंय.

Prakash Ambedkar : खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) सध्या वादाचं कारण बनली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या हिंदुत्त्ववादी संघटनांनी ही कबर हटवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी तसेच वेगवेगळ्या पक्षांनीही ही कबर हटवावी अशी मागणी केलीय. दरम्यान, एकीकडे हा मुद्दा चर्चेचा विषय बनलेला असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्वीटची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे, असं म्हटलंय.
प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलंय?
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच एक्स या समाजमाध्यमावर औरंगजेबाच्या कबरीवर एक भाष्य केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली आहे. 'ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. 2026 साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत. होय तुम्ही खरं वाचलंय. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे. 2026 साली निवडणूक होणार आहे,' असं प्रकाश आंबेडकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
औरंगजेबाची कबर कशाला पाहिजे- एकनाथ शिंदे
दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी औरंगजेबाची कबर हटवून टाकावी अशी भूमिका घेतली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जी शिवभक्तांची भूमिका तीच माझी भूमिका असं म्हणत औरंगजेबाची कबर कशाला पाहिजे? असा सवाल केलाय, त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण
दुसरीकडे औरंगजेबाची कबर ही प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियम 1951 कायद्यानुसार संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. म्हणजेच या कबरीला कायदेशीर संरक्षण पुरवण्यात आलेले आहे. तसेच ही जागा वक्फची असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे आता कबर हटवण्याच्या मागणीला किती अर्थ आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

