पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार; 40 ते 50 कोटींचा खर्च अपेक्षित
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार आहे. विठुरायाच्या मंदिराच्या मूळ रुपासाठी 40 ते 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी आराखडा बनवण्यात आला आहे. विठुरायाच्या राउळीला 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्याच्या आराखड्याबाबत आज अंतिम बैठक होणार आहे. यासाठी अंदाजे 40 ते 45 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या आराखड्याला अंतिम मान्यता आजच्या बैठकीत दिली जाईल. आज होणाऱ्या बैठकीस पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाचे आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अंतिम मंजूर केलेला हा आराखडा परवानगीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
या कामामध्ये रासायनिक प्रक्रियेने विठ्ठल मंदिराचे मजबुतीकरणाला साधारण साडे आठ कोटी रुपये एवढा खर्च होणार असून मंदिराच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणाला साडेचौदा कोटी खर्च होणार आहे. विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यासाठी साडे सहाकोटी खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नव्याने उभ्या कराव्या लागणाऱ्या वास्तूसाठी साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना मंदिराची आर्थिक परिस्थिती पाहून प्राधान्यक्रम ठरवून ही कामे हाती घेतली जाणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामध्ये मंदिराला 32 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला असल्याने या कामासाठी शासनाकडूनही आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशभरातील भाविकांना मंदिराच्या कामासाठी आर्थिक मदत करण्याचेही आवाहन केले जाणार आहे.
दरम्यान, दरवर्षी लाखो भाविक विठूराया चरणी साकडं घालण्यासाठी देशभरातून पंढरपुरात दाखल होत असतात. येत्या काळात वारकऱ्यांना त्यांच्या पंढरीचं बदललेलं रुप पाहायला मिळणार आहे. विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षांपूर्वी असलेलं पुरातन रुप देण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुरातत्व विभाग पंढरपुरच्या नव्या मंदिर आराखड्यावर काम करत आहे. पुढच्या काळात मंदिर साकारताना वाढती गर्दी, संभाव्य धोके यांसारख्या गोष्टी विचारात घेऊन मंदिराची रचना केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना 700 वर्षांपूर्वीचं मंदिर पाहता येणार आहे. मंदिराची रेखीव दगडात उभारणी केली जाणार आहे. नामदेव पायरीपासून ते गाभाऱ्यापर्यंत सर्व बदल केले जाणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :