(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Terna Sugar Factory: तानाजी सावंत यांना मोठा दिलासा, 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली
Terna Sugar Factory: जिल्हा बॅंकेने केलेली प्रक्रिया योग्य ठरवत ढोकीचा तेरणा साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाला भाडेतत्वावर देण्याचे कर्ज वसुली न्यायाधिकरण कोर्टाने आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद: राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे आदेश कर्ज वसुली न्यायालयाने दिलेत. सावंत यांच्याविरोधात माजी मंत्री अमित देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. आता याच याचिकेवर न्यायालयानं सावंत यांना दिलासा दिला आहे.
उस्मानाबादचा तेरणा कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांना चालवण्यासाठी हवा होता. मंत्री तानाजी सावंत आणि अमित देशमुख यांच्यात त्यासाठी तीव्र स्पर्धा झाली. हा कारखाना ज्याच्या ताब्यात राजकीय सत्ता त्याच्या खिशात असं उस्मानाबादेतलं समीकरणच आहे. पण जिल्हा बॅंकेने केलेली प्रक्रिया योग्य ठरवत ढोकीचा तेरणा साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाला भाडेतत्वावर देण्याचे कर्ज वसुली न्यायाधिकरण कोर्टाने आदेश दिले आहेत. हा कारखाना पुढची 25 वर्षे सावंत यांच्या समुहाकडे राहणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा बँकेनी राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य असल्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समुहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती. पण माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समुहाने याविरोधात DRAT कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली होती. एक वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.
तेरणा कारखान्याचा राजकारणात दबदबा
तेरणा कारखान्याच्या जवळपास 120 खेडेगावात 32 हजारांच्यावर सभासद आहेत. उस्मानाबाद आणि शेजारील लातूर जिल्ह्यात संपर्क आहे. 1,500 कामगारांना रोजगार मिळणार असून यामुळे या भागातील आर्थिक गणित बदलणार आहे. तेरणा ज्याच्या ताब्यात त्याकडे आमदार व इतर राजकीय सत्ता राहते हे आजवरचे गणित राहिले आहे. उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना केंद्रबिंदू असतो. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार आहेत,
तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याची 5,000 मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्पचा समावेश आहे. भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये, तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये वार्षिक भाडे स्विकारले जाणार आहे.
शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासून करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे. डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासून चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासून तीन रुपये आकारले जाणार आहे. वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासून करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत. या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे.