खळबळजनक! पोलीस शिपाईच करत होता कारागृहात ड्रग्जचा पुरवठा
कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक अंगझडतीत थरथर कापत असणाऱ्या या शिपायाकडे जो माल मिळाला त्याची किंमत हजारोंच्या घरात आहे

नागपूर : जेल में सब कुछ मिलता है!, असं म्हणतात खरं. याचीच प्रचितीही सध्या येत आहे. ही प्रचिती एका पोलीस शिपायामुळंच आली आहे, कारण नागपूर केंद्रीय कारागृहात ड्रग्स घेऊन आत जाणारा चक्क कारागृहातील पोलीस शिपाईच निघाला. त्यामुळं आता तो कैद्यांना ड्रग्ज पुरवत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
केंद्रीय कारागृहात ड्रग्ज नेणारा हा शिपाई २८ वर्षीय असून, त्याचं नाव महेश सोळंकी असल्याचं कळतं. त्यानं नागपूर कारागृहात ड्युटीवर येताना छोट्या मोठ्या प्रमाणात नाही तर चक्क २८ ग्राम अमली पदार्थ कारागृहात नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. हा पदार्थ तो मोज्यात लपवून नेत होता. कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक अंगझडतीत थरथर कापत असणाऱ्या या महेश सोळंकीकडे जो माल मिळाला त्याची किंमत हजारोंच्या घरात आहे.
धंतोली पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. सोळंकीकडे सापडलेला हा अमली पदार्थ चरस असल्याचे कळते आणि २८ ग्राम चरसची साधारणतः रुपये ७०००० इतकी किंमत आहे. पण जेल मध्ये श्रीमंत, व्यसनी गुन्हेगार अशा गोष्टींसाठी बरेच पैसे मोजण्यासाठी तयार असतात. सदर प्रकारची प्रकरणं उघडकीस येताच याबाबतची माहिती समोर येते.
गुन्हेगारांच्या ड्रग्जसाठी कितीही किंमत मोजण्याच्या या प्रकारामुळेच त्यांच्या या पैशांच्या प्रलोभनाला बरेच वेळा कर्मचारी बळी पडताना दिसतात. कुख्यात गुंडांचे वाढदिवस, जेलमध्ये मांडवल्या जाणे, जेल मध्ये चक्क केक येणे, सिगारेटी येणे, मटण चिकनच्या पार्ट्या झोडणे असे किस्से अनेक वेळा रंगले आहेत. असं कळतं की मनिष सोळंकी या शिपायाला इथे २ वर्षांपूर्वीच नोकरी लागली होती. पुढच्या महिन्यात तो लग्नबंधनातही अडकणार होता. पण, आता मात्र त्याच्यापुढं असणाऱ्या अडचणी अधिकच वाढल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
