कोकणातील 'या' गावात 100 वर्षांचा सामाजिक सलोख्याचा करार
गावात अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात. काही ठिकाणी तर आपापसात शुल्लक गोष्टींवरुन वाद ही होत असतात. पण या गावात आपल्याला शांततेच आणि एकरुपतेचे दर्शन घडते
रत्नागिरी : राज्यात गेल्या महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एन्ट्री झाली. त्यांच्या झालेल्या सभेचे पडसाद आजवर उमटत आहेत. भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत असतांना आपल्याला पाहायला मिळत आहे.
मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसा पठण च्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून ठिकठिकाणी राजकीय वादंग निर्माण झाले. अशी परिस्थिती असताना सुद्धा जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सोंडेघर गावाने एक पाऊल पुढे येत गावात सामाजिक सलोख्याचा 100 वर्षाचा करार केला आहे. महाराष्ट्रातील ही दुसरी घटना आहे. गावात अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात. काही ठिकाणी तर आपापसात शुल्लक गोष्टींवरुन वाद ही होत असतात. पण या गावात आपल्याला शांततेच आणि एकरुपतेचे दर्शन घडते. भोंगा आणि हनुमान चालीसा याबद्दल गावात शांततेचा भंग होऊ नये यासाठी गावातील सर्व जातीच्या लोकांनी एकत्रित येउन बैठकीत सलोख्याचा 100 वर्षांचा कराराचा निर्णय घेतला. या करारामुळे राजकीय पक्षांना ही चपराक असल्याचे बोलले जात आहे.
राज्यामध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या राजकिय हेवे दावांमुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु याचा आपल्या गावावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही असा दृढनिश्चय सोंडेघर गावाने घेतला असून देशात व राज्यात कितीही धार्मिक तेढ निर्माण झाला तरीही आपल्या गावामध्ये कोणताही वादविवाद होऊ द्यायचा नाही व आपल्या गावात सुरु असलेली सामाजिक सलोख्याची भावना कायम टिकवून ठेवायची असा एक मताने ठराव या गावातील नागरिकांनी केला आहे. या ठरावावर गावातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध या तीनही धर्मातील लोकांनी बैठकीत उपस्थितीत पोलिस अधिकारी यांच्या समोर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे या गावाचा सलोख्याचा करार यशस्वी झाला आहे.
सोंडेघर गावाने केलेल्या सामाजिक सलोख्याच्या कराराची चर्चा राज्यभर सुरू असून राज्यात एकीकडे सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असल्याचे चर्चिले जात आहे. तर दुसरीकडे मात्र सोंडेघर गावाने सामाजिक सलोखाच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव व ऐक्याचे प्रतीक सामाजिक सलोखा दाखवून दिला आहे. त्यामुळे राज्यात या गावाचा मोठा बोलबाला सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून या गावात कोणत्याही प्रकारचा सामाजिक धार्मिक वाद-विवाद नसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली ही प्रथा परंपरा पुढील पिढीकडे हस्तांतरित व्हावी व आज पर्यंत सुरू असलेला सलोखा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
गावातील हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने गावांमध्ये राहत आहेत या तीनही धर्मातील सण उत्सवात एकत्रितपणे साजरे केले जातात. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या हिंदू मुस्लिम एकमेकांच्या सणांमध्ये सर्वजण उत्फुर्तपणे भाग घेतात कार्यक्रम एकत्रितपणे शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडले जातात. गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा धार्मिक सलोखा बिघडेल अशा प्रकारचे कृत्य या गावात कोणाच्या हातून घडत नाही. तसेच काही मतभेद किंवा कौटुंबिक वाद धार्मिक वाद निर्माण झाल्यास या गावातील तीनही धर्मातील बुजुर्ग मंडळी एकत्र बसून सामोपचाराने गावातल्या गावात वाद मिटवला. त्यामुळे कोणताही वाद पोलीस स्टेशनला जात नसल्याने गावात शांतता अबाधित आहे. तंटामुक्तीच्या माध्यमातून गावामध्ये सर्वानुमते सामाजिक सलोख्याचा शंभर वर्षाचा लिखित करार केला आहे. या लिखित कराराचे गावकऱ्यांनी स्वागत सुद्धा केले आहे. या सलोख्याच्या करारामुळे कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही याची काळजीसुद्धा गावकर्याने घेतले आहे. या गावाने सार्वभौम पद्धतीने केलेल्या करारामुळे गावाच्या प्रगतीला हिताचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे प्रत्येक गावाने गुण्यागोविंदाने सामाजिक सलोख्याचे नाते ठेवले तर नक्कीच आपल्या गावातील शांतता कायम टिकून राहिल यात मात्र शंका नाही.