एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरातील बीड गावात सोन्याचा पाऊस?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बीड नावाचं गाव आहे. या गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी अख्यायिका आहे. फक्त अख्यायिकाच नाही तर गावातल्या अनेकांना सोनं सापडतंही.
कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यात बीड हे गाव आहे. तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलं आहे. सध्या हे गावं इतर गावाप्रमाणे वाटत असलं तरीही या गावाने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. कारण या गावात परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो, असं या गावातील लोक सांगतात.
शेतात, वाटेत, नदीत...सगळीकडेच सुवर्णमुद्रा!
या गावात कल्लेश्वरचा माळ आणि बीड शेड परिसरात डाळीच्या आकाराची सोन्याची छोटी छोटी नाणी सापडतात. त्यामुळे या गावावर सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो, ही आख्यायिका आहे. गावातील अनेक घरातील देव्हाऱ्यात ही नाणी पुजली आहेत. शेतात काम करत असताना, रस्त्याने जाताना इतकंच काय जनावराच्या शेणावर आणि शेतीच्या पानावरही अनेक लोकांना नक्षीकाम केलेले सोन्याचे छोटे मोठे तुकडे यापूर्वी सापडले आहेत. ते आजही सापडतात. ग्रामस्थांना मिळालेलं सोनं जपून ठेवलं आहे, तर काही हौशींनी ते आपल्या अंगठीतही मढवून घेतलं आहे.
शिलाहार राजाच्या राजधानीचं गाव 'बीड'
या गावावर परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो असं म्हटलं जात असलं, तरीही वास्तवात बीड हे गाव बाराव्या शतकात शिलाहाराच्या राजधानीचं गाव होतं. या राजाने पन्हाळगड बांधला आहे अशी इतिहासात नोंद आहे. राजधानीचं गाव अर्थातच गावाभोवती तटबंदी होती. राजवाडा होता. जुन्या विहिरी, वास्तू होत्या. राजधानी असल्यामुळे तत्कालीन परिस्थितीत सोन्याची नाणी काढली जात होती. ही नाणी डाळीच्या आकाराची आणि विशेष म्हणजे त्यावर मुद्राही उमटवली होती. बीडमध्ये बहुतेक घरांत एक-दोन स्वरुपात ही नाणी आहेत. अर्थात त्या नाण्यात खूप श्रद्धा दडलेली आहे. काही कालावधीनंतर हे गाव लुप्त झालं, या परिसरात खोदकाम करताना सहज ही नाणी मिळाल्याने या गावात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका रुढ झाली.
गावाचा कायापालट आणि इतिहासाची दंतकथा
या गावात कल्लेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. सतीचे वाण दाखवणारी देशातली एकमेव वीरगळ याच मंदिर परिसरात आहेत. सतीच्या प्रथेचे दगडात कोरलेले प्रत्यक्ष चित्रण या शिलेवर आहे. तत्कालीन प्रथा परंपरेवरही वीरगळ प्रकाशझोत टाकणारी आहे. मंदिर परिसरात 100हून अधिक शिलालेख आणि विरशिळा आहे. त्यावर बाराव्या शतकातील अनेक मजकूर लिहिलेले आहेत. काही वर्षापूर्वी अनेकांनी मंदिर परिसरातील पुरातन कोरीव मूर्ती आणि शिलालेख पळवून नेल्याचं लोक सांगतात. मंदिर परिसरात तटबंदीचे अवशेष आणि रानबाव या विहिरीतही प्राचीन अवशेष आहेत. कोल्हापूरला जेव्हा राजधानीचा किंवा मुख्य लष्करी ठाण्याचा दर्जा नव्हता, त्या वेळी तुळशी आणि भोगावती नदी काठावरच्या या गावाला शिलाहार राजाच्या मुख्य ठाण्याचा दर्जा होता. अर्थात त्या दर्जाला साजेसा असाच समृद्धीचा वारसा या परिसराला होता. काळाच्या ओघात गावाचा कायापालट झाला; पण गावाचा इतिहास या पिढीकडून त्या पिढीकडे दंतकथेच्या स्वरुपात फिरत राहिला.
संशोधकांचा शोध सुरु
बीड हे शिलाहारांच्या राजधानीचं गाव साधारण 1200 सालात अतिशय समृद्ध असल्याचे स्पष्ट झालं आहे. विशेष हे, की आपल्या गावाचा हा इतिहास पुराव्याच्या निकषावर जगासमोर आणण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. हे गाव बाराव्या शतकात शिलाहारांच्या मुख्य ठाण्याचं गाव होतं. शुद्ध सोन्याची नाणी काढणारी आणि नाण्यावर वेगवेगळे छाप उठवणारी इथे टांकसाळच होती. अशा दंतकथांवर आधारित असलेली बीडची चर्चा इतिहासात आहे. त्याची मूर्त साक्ष याच परिसरात असलेल्या शिलालेखातून मिळते. यावर इतिहासाचे अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि डॉ. आनंद दामले संशोधन करत आहेत.
प्रसिद्धीपासून शेकडो मैल लांब असणाऱ्या या गावातील मंदिराची नोंद पुरातन विभागातही नाही, हे विशेष म्हणावं लागले. राज्य सरकारने या गावाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं आहे. मात्र अता तरी या गावचा इतिहास आणि पुरातन मंदिरांची दखल घेऊन पर्यटनाच्या दृष्टीने पावलं उचलावीत, यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement