Eknath Shinde Ajit Pawar Video: तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु...; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषद सुरु होताच कोपरखळ्या
Eknath Shinde Ajit Pawar Video: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल (2 मार्च) महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यात विरोधकांवर सडकून टीकाही करण्यात आली.

Eknath Shinde Ajit Pawar Video मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) आजपासून (3 मार्च) सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जरी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणा चालू ठेवाव्या लागणार आहेत. शिवाय जुन्या योजना सुरु ठेवत अर्थिक तूटही भरुन काढावी लागणार आहे. सोबतच खर्चाला अर्थिक शिस्तही लावावी लागणार आहे. कारण राज्यातील विकासकामे करणा-या कंत्राटदारांची जवळपास 80 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अर्थसंकल्प मांडताना मोठी आव्हानं असणार आहेत.
एकनाथ शिंदे अन् अजित पवारांच्या एकमेकांना कोपरखळ्या-
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल (2 मार्च) महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यात विरोधकांवर सडकून टीकाही करण्यात आली. एकमेकांना कोपरखळ्या मारत या महायुतीच्या पत्रकार परिषदेत सुरुवात झाली. अजित पवारांनी आपली खुर्ची फिक्स केल्याची मिश्किल टीप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही. त्याला मी काय करु, असा प्रतिटोला अजित पवारांनी लगावला. यानंतर आमची फिरणारी खुर्ची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अलिकडे रोज स्थगितीची बातम्या पहायला मिळते. मी स्थगिती दिली असं मला एकायला मिळतं. मग मला माझ्या ऑफिसला विचारावं लागतं. तेव्हा मला सांगितलं जातं आपल्याकडे अशी फाईल आलीच नाही, मग मला शोधून काढावं लागतं. आमच्याकडे कोणत्याही आमदाराने निवेदन दिल्यावर काहीही मागणी किंवा आरोप केला असेल तर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती घ्यावी असं आपण लिहतो. याचा अर्थ चौकशी सुरु झाली आता स्थगिती आली अशा बातम्या करणं बाळबोध होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. चूक होती आहे असं लक्षात आलं तर मी निश्चित स्थगिती देईन आवश्यक्ता पडल्यास खातं शिंदेंचं असेल तर त्यांच्या चर्चा करेन, अजितदादांशी संबंधीत असेल तर त्यांच्याशी चर्चा करेन. पण काही तरी ओढाताण सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी सुरु केलेल्या गोष्टी बंद करतायत असं काही नाही. आपल्याकडे एखादी बातमी आल्यावर दुसरी बाजू आल्यावर दिली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी संवाद टाळला-
दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात नाराजीनाट्य पहायला मिळालंय. या कार्यक्रमात अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी संवाद टाळल्याचं दिसलं. अजितदादांच्या समोरच धनंजय मुंडे उभे होते मात्र अजितदादांनी ना मुंडेंकडे पाहिलं ना त्यांच्याशी संवाद साधला. याउलट धनंजय मुंडेंच्या समोरुन निघून गेले.. या व्हिडीओची आता जोरदार चर्चा रंगलीये. अजितदादांचे जवळचे मानले जाणारे धनंजय मुंडे आणि परके होवू लागलेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र यावर कोणतीही नाराजी नसल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.

























