(Source: ECI | ABP NEWS)
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीतील अ गटातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

Ind vs NZ दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारतानं जिंकला. आता भारताचा सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. रोहित शर्माचं नेतृत्त्व आणि त्याला मिळालेली खेळाडूंची साथ या जोरावर भारतानं विजय मिळवला. रोहित शर्माचा एक निर्णय या मॅचमध्ये गेमचेंजर ठरला. तो म्हणजे हर्षित राणाच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात घेण्याचा होय.
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 249 धावा केल्या होत्या. यामध्ये श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा होता. न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर बाद झाला. केन विलियमन्सननं 81 धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याला वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी कारण ठरली.
न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या 98 धावांच्या भागिदारीमुळं भारताचा डाव सावरला. श्रेयस अय्यरनं 79 धावा, अक्षर पटेलनं 42 आणि हार्दिक पांड्यानं 45 धावांची खेळी करत भारताला 249 धावांपर्यंत पोहोचवलं.
वरुण चक्रवर्तीचं वादळ, न्यूझीलंडच्या फलंदाजांची दैना
भारताच्या विजयात सर्वात मोठं योगदान श्रेयस अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांचं राहिलं. वरुण चक्रवर्तीनं 5 विकेट घेत न्यूझीलंडला धक्के दिले. याशिवाय कुलदीप यादव, अक्षर पटेल यांनी देखील विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकीमुळं न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव वाढला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळताना 5 विकेट काढणारा वरुण चक्रवर्ती पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण?
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीतील अ गटातील तीन मॅच जिंकल्या आहेत. भारतानं यापूर्वी बांगलादेश, पाकिस्तानला पराभूत केलं आहे. न्यूझीलंडला देखील भारतानं पराभूत केलं. दुबईत पहिल्यांदा फलंदाजी करुन विजय मिळवणारा भारतीय संघ पहिला ठरला आहे. अ गटातील पहिल्या संघाचा सामना ब गटातील दुसऱ्या संघासोबत होणार आहे. अ गटात भारत टॉपवर असून ब गटात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना 4 मार्चला होणार आहे.
दरम्यान, भारतानं न्यूझीलंडला चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभूत करुन मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढला आहे. आता भारतासमोर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.
इतर बातम्या :





















