शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य करून फरार झालेला नागपूरचा प्रशांत कोरटकर कोल्हापूरमध्ये दाखल गुन्ह्यात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर व्हिडिओमधून तत्काळ प्रकट झाला आहे. प्रशांत कोरटकरचा व्हिडिओ रविवार रात्री बाहेर आला. त्याने व्हिडिओ करताना माफी मागितलेली नाही. मात्र, शिवाजी महाराजांचे कौतुक करताना दिसून येत आहे.
व्हिडिओ व्हायरल करत कोरटकर काय म्हणाला?
प्रशांत कोरटकर व्हिडिओत म्हणतो की, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मरदा मुजरा करतो असे कोरटकर म्हणताना दिसून येत आहे.
पोलिसांना अजूनही कोरटकर सापडेना
दरम्यान, प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे प्रशांत कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही.
नागपूरमधील गुन्ह्याचा तपासही कोल्हापूर पोलिसांकडे
दरम्यान, प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपासही आता कोल्हापूर पोलीस करणार आहेत. नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रितसर कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे तपासाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून नागपुरातील गुन्हाही कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करत तपासाची सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू
दरम्यान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरनेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर मधून ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यामुळे तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा प्रशांत कोरटकर तोंडघशी पडला आहे. प्रशांत कोरटकरने फोन करून थेट धमकी दिली, असे इंद्रजित सावंत यांनी ऑडिओ क्लीप समोर आणत सांगितले होते. सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ऑडिओ क्लीपमधून दिसून येते.
इतर महत्वाच्या बातम्या
























