... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपीवर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून राजकीयनंतर आता अध्यात्मिक संत, महंतांनीही याप्रकरणात उडी घेतली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि बीडमधील नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी भगवानगडावर जाऊन भगवान बाबाचे दर्शन घेतले आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdeo shastri) यांच्यासोबत राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं. त्यानंतर, धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100 टक्के खात्रीने सांगतो, असेही त्यांनी म्हटले. मात्र, हे सांगत असतानाच आरोपींना आधी चापट मारली गेली आणि त्यानंतर हे घडले, त्यामुळे आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा, असे नामदेवश शास्त्री यांनी म्हटले. त्यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात 10 चापटा त्यांनी मारल्या असत्या तरी चालले असते. मात्र, केवळ एकाच चापटेच्या बदल्यात अशा प्रकारचा भीषण खून करण्यात आला.
संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपीवर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला 10 चापट मारल्या असत्या तरी चाललं असतं, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी, शास्त्री महाराजांच्या वक्तव्यावरुन त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल असं तुम्ही म्हणता, मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज बघतोय, सगळे लोकं बघतायत, त्याचंही उत्तर दिलं पाहिजे असे धनंजय देशमुख यांनी म्हटले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशी होणार असं म्हटलंय, आता आम्ही त्याचीच वाट बघतोय, तीच आमची मानसिकता आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटल.
जातीय संघर्ष नसून ही विकृती
एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता तुमची असेल तर तुम्ही समाजाचं देणं लागत नाहीत हे स्पष्ट झालंय. पण, अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुदडे पडतील, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून 18 पगड जातीचे लोक संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून ही विकृती असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
