Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
Mobile Phone Blast : मोबाईल वापरणे ही अत्यावश्यक गरज असल्याचं समजलं जातंय. पण खिशात बसणाऱ्या मोबाईलमुळे आपल्या जीवावरही बेतू शकतं हे अनेकदा समोर आलं आहे.
मुंबई : तुम्ही रोज बॉम्ब घेऊन फिरता असं आम्ही म्हटलं तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे. तुमच्या हातात असणारा मोबाईल हा तुमच्या जीवावरही बेतू शकतो. गोंदियात अशीच एक घटना घडली आहे. मोबाईलच्या स्फोटात एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागलाय. नेमकं काय घडलंय पाहूया त्यासंदर्भातला एक रिपोर्ट.
तुमच्या हातातला मोबाईल, काळाची गरज समजला जाणारा मोबाईल हा गोंदियातील एका शिक्षकासाठी काळ बनलाय. गोंदियातील त्या मृत शिक्षकाचं नाव आहे सुरेश संग्रामे, ज्यांचा मोबाईलने घात केलाय. खिशात ठेवलेला मोबाईल अचानक फुटला आणि सुरेश संग्रामे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले नत्थु गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.
मोबाईल कोणत्या कंपनीचा होता?
ज्या मोबाईलचा स्फोट झाला त्याबद्दल काही माहिती समोर आली आहे. स्फोट झालेला मोबाईल हा सी.एम.एफ फोन 1 कंपनीचा होता. मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग जुलै 2024 मध्ये करण्यात आलं होतं. त्या शिक्षकाने महिनाभरापूर्वीच मोबाईलची खरेदी केली होती. त्यामुळे नव्या कोऱ्या मोबाईलचा स्फोट कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दुय्यम दर्जाचा मोबाईल किंवा चार्जर वापरल्यास अशा घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलंय. पण मोबाईलचा स्फोट होण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.
त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.
मोबाईल वापरताना काय काळजी घ्याल?
- चार्जिंगला लावून मोबाईलचा वापर करू नये.
- डुप्लिकेट चार्जने फोन चार्ज करू नये.
- सततच्या वापराने फोन गरम होत असल्यास काही वेळ फोन स्वीच ऑफ करून ठेवावा.
- पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर टाळावा.
- यासोबतच अतिमोबाईलचा वापरही टाळणं गरजेचं आहे.
पुण्यातील टेकनॉलॉजी एक्सपर्ट अतुल कहाते यांनी घडलेल्या घटनेबाबत बोलताना म्हटले की, मोबाईल मध्ये स्फोट होण्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र, घाबरून जाण्याचं कोणतही कारण नाही. दुय्यम दर्जाच्या कंपनीचा मोबाईल घेतला असेल आणि त्यात डुप्लिकेट बॅटरी टाकली असेल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. तसेच, चार्जर देखील दुय्यम दर्जाचा असला तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो, असे कहाते यांनी सांगितले. त्यामुळे, इतर मोबाईल युजर्सने घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, चांगल्या कंपनीचाच मोबाईल घेणे कधीही चांगले हेच या घटनेवरून दिसून येईल. तसेच, मोबाईलमध्ये बॅटरी बदलताना संबंधित कंपनीची व उत्कृष्ट दर्जाचीच घ्यायला हवी, असा सल्लाही कहाते यांनी दिला आहे.
काळाची गरज समजला जाणारा मोबाईल हा आपल्या जीवावरही बेतू शकतो हे अनेकदा स्पष्ट झालं आहे. एका मुठीत बसणारा मोबाईल बेसावधपणे न वापरता काळजीपूर्वक वापरायला हवा.
ही बातमी वाचा: