कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला, प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र लाड यांचे निधन
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन, स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र (भाऊ) लाड यांचे काल निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी अखेरचा श्वास घेतला.
![कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला, प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र लाड यांचे निधन freedom fighter captain Rambhau Lad passes away at kundal कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला, प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र लाड यांचे निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/49b6da13e2cb08acd0500ffda921c455_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rambhau Lad Passed Away : इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन, स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ लाड यांचे काल निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी कॅप्टन रामभाऊ लाड यांनी अखेरचा श्वास घेतला. कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पलूस येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल हे त्यांचे गाव. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
ब्रिटीशांना धडकी भरवणाऱ्या प्रतिसरकारच्या 'तुफान सेने'चे रामभाऊ लाड हे कॅप्टन होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारच्या चळवळीतील एक महत्त्वाचे शिलेदार म्हणून रामभाऊ लाड यांना ओळखले जात होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या 'तुफान सेने'चे कॅप्टन म्हणून रामभाऊ लाड हे नेतृत्व करत. 1942 ते 46 च्या दरम्यान तुफान सेनेने इंग्रज सरकारला धडकी भरवण्याचं काम केले. या सेनेचा कॅप्टन म्हणून रामभाऊ लाड यांनी सर्व धुरा सांभाळली होती. इंग्रजांचा खजाना लुटने किंवा रेल्वे, पोस्ट सेवा यांच्यावर हल्ला करून ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्याचे काम तुफान सेनेच्या वतीने करण्यात येत होते.
1942 मध्ये एस एम जोशी यांच्या शिबारसाठी कुंडलच्या क्रांतीकारकांनी कॅप्टन रामभाऊ लाड यांना औंध येथे पाठवले होते. तेथूव क्रांतीची प्रेरणा घेऊन ते कुंडल येथे आले. त्यानंतर त्यांनी गावातच प्रशिक्षण सुरू केले. शिबारात लाठी, काठी, बंदूक चालवणे , गनिमी पद्धतीने चळवळ वाढवणे यासारखे शिक्षण दिले. या ट्रेनिंग संटरचा प्रमुख म्हणून रामभाऊ लाड यांना कॅप्टन ही उपाधी देण्यात आली होती. प्रतिसरकारच्या स्थापनेनंर संरक्षणाची तसेच घेतलेले निर्णय राबविण्याची जबाबदारी रामभाऊ यांच्यावर होती. स्वातंत्र्यानंतर शेकापच्या प्रत्येक लढ्यात रामभाऊ अग्रभागी राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील कॅप्टन रामभाऊ लाड यांचा मोलाचा सहभाग राहिला. इयत्ता दुसरी शिक्षण झालेले रामभाऊ लाड यांनी 'असे आम्ही लढलो' आणि 'प्रति सरकारचा रोमहर्षक रणसंग्राम' ही दोन पुस्तके त्यांनी लिहली. रामभाऊ लाड हे कुस्तीप्रेमी देखील होते. कुंडलमधील कुस्ती मैदान असो किंवा अन्य ठिकाणी कुस्ती मैदान, रामभाऊ लाड हे कुस्ती मैदानात समालोचक म्हणून देखील काम करत होते. त्यांचा भारदस्त आवाज हा कुस्तीप्रेमी आणि कुस्तीगिरांना नेहमीच प्रेरणा देत होता. रामभाऊंच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)