कधी ढगाळ कधी कोरडे, मराठवाड्यात पुढील 4 दिवस तापमानात बदल, शेतकऱ्यांनी काय करावे?
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसांठी कृषी हवामान सल्ला दिलाय. पिकव्यवस्थापनासाठी काय करावे?
Marathwada Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कधी ढगाळ कधी कोरडे हवामान राहिल्याने तापमानात चढउतार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसात मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर फारशी तफावत नसेल असं सांगण्यात आलं आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. पीक व्यवस्थापन कसे कराल? (Agricultural Weather Advisory)
ऊस पीक
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे.
ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकावर फवारणी करा
हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.
हरभरा
हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना 5 % निंबोळी अर्काची किंवा 300 पीपीएम अझाडीरेकटीन 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % - 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 88 ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 3 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 60 मिली) किंवा फ्लुबेंडामाईड 20 % - 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 125 ग्रॅम) फवारावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.