Birth Anniversary: कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे
समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे बाबा आमटे यांची आज जयंती आहे. कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर देखील त्यांनी मोठे काम केले.
Birth anniversary: समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबा आमटे यांची आज जयंती आहे. 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट या शहरात त्यांचा जन्म झाला होता. मुरलीधर देवीदास आमटे असे त्यांचे मूळ नाव. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली. तसेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत देखील बाबा आमटे यांचा सहभाग होता. त्यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले. त्यांचा आदिवासी समाजाविषयी असणारा आदरभाव आणि उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते.
बाबा आमटे यांचे वडील देविदास आमटे हे मोठे सावकार होते. घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासून बाबा फार दयाळु होते. वरोड्यापासून पाच मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये पार पडले. नागपूर विद्यापीठातून 1934 मध्ये ते बी.ए. आणि 1936 मध्ये ते एल.एल.बी. ही पदवी मिळवली. डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या बाबा आमटे यांनी वडिलांच्या आग्रहाखातर वकील झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीसुद्धा केली.
महत्मा गांधींच्या विचारांनी प्रभावीत
बाबा आमटे सेवाग्राम आश्रमात राहत असताना महत्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत सहभाग घेतला. 1943 मध्ये वंदे मातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 1949-50 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे त्यांनी केवळ डॉक्टर्ससाठी उपलब्ध असलेला कुष्ठरोग निदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. पंजाब दहशतवादाने धुमसत असताना तेथील नागरिकांना तेसुद्धा भारताचे नागरिक असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबा आमटे यांनी 1985 मध्ये भारत जोडो अभियानाद्वारे भारत भ्रमण केले होते. याद्वारे त्यांनी जनतेपर्यंत एकात्मतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 12 वर्ष त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता.
आनंदवनाची स्थापना
बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग असलेल्या रुग्णांची सेवा केली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगग्रस्तांना आधार देण्याचे मोठे काम त्यांनी केले. यासाठी त्यांनी 1952 साली वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केली. आनंदवन हे अनेक कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या कार्याचा विस्तार केला. आज आनंदवनात सर्व जाती-धर्माचे, सर्व थरांतील लोक आहेत. कुष्ठरोग्यांप्रमाणेच अंध, मूक-बधिरांसाठी विशेष शाळा देखील आनंदवनात आहेत. त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालय आणि अन्य प्रकल्पांची स्थापना सुद्धा केली. प्रौढ व अपंगांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी त्यांनी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे शेती व शेतीजोड व्यवसायसुद्धा सुरू केले. यामध्ये दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली आहेत.
लोकबिरादरी प्रकल्प
बाबा आमटे यांनी आदिवासींच्या विकासासाठी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत आदिवासींना शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात. याशिवाय या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे सुरू आहेत. बाबा आमटेंच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे हे या प्रकल्पाचा समर्थपणे सांभाळ करत आहेत. संवेदनशीलता, धाडस, प्रखर बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य या गुणांच्या आधारे बाबा आमटे यांनी समाजातील दुःखी, कष्टी, दीनदुबळ्यांची, समाजाने नाकारलेल्यांची सेवा केली. बाबा आमटे यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नी साधना आमटे यांची साथ लाभली. समाजसेवक बाबा आमटे हे प्रतिभावान साहित्यिकसुद्धा होते. त्यांनी ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
1) पद्मश्री पुरस्कार सन् 1971
2) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 1985
3) पद्मविभूषण 1986
4) मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988
5) आदिवासी सेवक अवार्ड 1991 भारत सरकार
6) सावित्रीबाई फुले अवाॅर्ड 1998 भारत सरकार
7) गांधी शांती पुरस्कार 1999
8)महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2004 महाराष्ट्र सरकार
बाबा आमटे यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांनी या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करणाऱ्या बाबा आमटे यांचे 9 फेब्रुवारी 2008 ला वरोडा येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे आणि आमटे कुटुंबिय त्यांचा समाजकार्याचा वसा पुढे चालवत आहेत.