Amravati Corona news | अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांसाठी कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत सुधारित निर्देश
राज्य शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आता स्थानिक पातळीवरही प्रशासनाकडून अतिशय सक्तीचे निर्बंध लागू करण्यात य़ेत असल्याचं पाहायला मिळत आहे
अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळं आता प्रशासन पुन्हा एकदा काही महत्त्वाची पावलं उचलताना दिसत आहे. राज्य शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आता स्थानिक पातळीवरही प्रशासनाकडून अतिशय सक्तीचे निर्बंध लागू करण्यात य़ेत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीची आकडेवारी पाहता अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.
शनिवारी अमरावतीत 24 तासांमध्ये 1055 कोरोना रुग्ण आढळून आले. ज्यमुळं आता चिंतेत भर पडली. याच धर्तीवर अमरावतीमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. हा 36 तासांचा लॉकडाऊन सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत असणार अशी माहिती समोर आली होती. या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, दवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका या सेवांना वगळण्यात आलं आहे.
CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
आता या विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी हे आदेश पारीत केल्याची माहिती समोर येत आहे.
- सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील.
- सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील.
- लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील.
- जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील
- राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम बंद
- खासगी आणि सरकारी वाहनात मास्क बंधनकारक
- रिक्षामध्ये चालकासह दोघांनाच परवानगी
- ग्राहकांना जवळच्याच दुकानांतून खरेदी करण्याचा सल्ला
- धार्मिक स्थळं ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.
- संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील.
- अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणेही बंद राहतील.