विधानसभेत आज मुख्यमंत्री उपस्थित राहणार? संजय राऊत म्हणतात...
Sanjay Raut on CM Uddhav Thackeray : विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Sanjay Raut : विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहतील का, याबाबत आडाखे बांधले जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात लक्ष देत असून त्यांचे नियंत्रण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्री सभागृहात येणार का, या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना 'वेट अॅण्ड वॉच' म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत भाष्य केले. हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनासाठी येणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत संजय राऊत यांनी म्हटले की, विधानसभेचे अधिवेशन उत्तम प्रकारे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. संबंधित बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. विधानसभेत येणार का, याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळत राऊत यांनी 'वेट अॅण्ड वॉच' अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खोचक टीका केली. राज्यपाल हे अभ्यासू आहेत, विद्वान आहेत. त्यांनी सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करू नये. अधिक अभ्यास केल्याने अजीर्ण होते. त्यांचा काहींना त्रास होतो. असा त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यास राज्याचे आरोग्य खातं सक्षम असल्याचे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, आजचा अधिवेशनाचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
