Sharad Pawar : संजय राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हेंनी तसं वक्तव्य करायला नको होतं: शरद पवार
नीलम गोऱ्हे यांनी स्वतःचा राजकीय अनुभव लक्षात घेता अशी काही वक्तव्यं टाळायला हवी होती असं शरद पवार म्हणाले.

मुंबई : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हेंनी तसं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं , संजय राऊत जे बोलले ते 100 टक्के योग्य असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. कमी कालावधीत चार पक्ष बलललेल्या नीलम गोऱ्हे यांना चार टर्म कशा मिळाल्या हे सर्वांनाच माहिती आहे असंही शरद पवार म्हणाले. साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय हा आरोप मात्र त्यांनी स्पष्टपणे नाकारला आहे.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी साहित्य संमेलनावर काही आक्षेप घेतले होते. शरद पवारांनाही त्यांनी सवाल केले होते. त्यावर आता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले की, "राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या. नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं. त्या संबंधात संजय राऊत जे म्हणाले ते योग्य आहे."
संजय राऊतांनी केलेल्या सवालावर शरद पवार म्हणाले की, "मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. पण साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतोय हे मात्र खरं नाही."
संजय राऊतांचा शरद पवारांना प्रश्न
साहित्य संमेलनाच्या मंचावर झालेल्या राजकीय चिखलफेकीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं होतं. साहित्य संमेलनाच्या मंचावरुन नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली. राष्ट्रवादीवर चिखलफेक होते तेव्हा ठाकरेंची सेना पाठीशी उभी राहते. आता पवार गप्प कसे असा सवाल संजय राऊतांनी केला होता. यावेळी संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरही टीका केली. खंडण्या घेऊन साहित्य संमेलन भरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
