(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget 2022 Date, Time : आज राज्याचा अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
Maharashtra Budget 2022 Date, Time : आज अधिवेशनात वर्ष 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सादर होणार. नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष.
Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर
अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.
आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे.
दरम्यान, 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला म्हणजेच, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले आहेत. अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. अशातच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :