आशा सेविकांना 1900 मोबाईल, वर्षभराचा रीचार्ज, इन्शुरन्स, मोफत शिक्षण..., 10 मिनिटात फडणवीसांनी सांगितल्या महिलांसाठीच्या 10 मोठ्या योजना
Maharashtra Government Schemes For Women : राज्य सरकारकडून महिलांसाठी ज्या मोठ्या योजना राबवल्या जात आहेत त्याची सखोल माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नागपूर: निमित्त होतं ते नागपूर जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या लोकार्पण सोहळ्याचं... त्याचवेळी राज्य सरकार महिलांसाठी ज्या 10 मोठ्या योजना (Maharashtra Government Schemes For Women) राबवत आहे त्याची माहिती अवघ्या दहा मिनिटात देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यामध्ये आशा सेविकांसाठीची योजना, मुलींना उच्च शिक्षणाची योजना, महिलांना मोफत गॅस सिलेंडर यासह 10 योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार कशा पद्धतीने महिलांच्या जीवनात बदल घडवतंय याची माहिती फडणवीसांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या महिलांसाठीच्या 10 योजना
1. आशा सेविकांना 1900हून अधिक मोबाईलचे वितरण
आजच्या कार्यक्रमात आशा सेविकांना 1900 हून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईल साठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याचे सांगितले. खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2. आशा सेविकांसाठी 10 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स
आशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
3. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी भगिणींना महिन्याला 1500 रुपयांची मदत देण्यात येते. यासाठी नावनोंदणी सुरू आहे.
4. मुलींना मोफत उच्च शिक्षण
राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आतापर्यतं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत केलं होतं. आता उच्च शिक्षणही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये खासगी महाविद्यालयातील फी राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. या योजनेमध्ये एकूण 507 कोर्सेसचा समावेश आहे.
5. महिलांना प्रवासासाठी अर्धे तिकीट
राज्य सरकारने महिलांसाठी एसटी बसमध्ये 50 टक्के कन्शेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटीही फायद्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
6. महिलांना तीन सिलेंडर मोफत
ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षामध्ये तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
7. मुख्यमंत्री अॅप्रेंटिसशीप योजना
मुख्यमंत्री अॅप्रेंटिसशीप योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरूणांना प्रशिक्षण कालावधीमध्ये महिन्याला 10 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त तरूणांना कशा प्रकारे काम देता येईल याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
8. दवाखाना आपल्या दारी
राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे. त्या माध्यामातून आतापर्यंत 1667 गावांमध्ये जवळवास 60 हजाराहून जास्त कँपचे आयोजन करण्यात आहे. त्या माध्यमातून 2.67 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
9. मुख्यमंत्री आरोग्य कक्ष, चॅरिटी बेड्सची सोय
मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून राज्यातील ट्रस्टच्या रुग्णालयांमध्ये चॅरिटी बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चॅरिटी बेड्सच्या माध्यमातून गरिबांना ट्रस्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन्स करण्यात येतात. त्यामध्ये अगदी एक लाखापासून ते 60 लाखांपर्यंते ऑपरेशन करण्यात आले आहे.
10. महात्मा फुले जनारोग्य योजना
राज्यातील 12 कोटी जनतेकरता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे. या आधी दीड लाख रूपयांपर्यंतचा उपचार मिळायचा. आता पाच लाखांपर्यंतचा उपचार देण्यात येतोय. या योजनेमध्ये रुग्णालयांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात येत आहे.
ही बातमी वाचा :