एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरं जाणार; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे काय म्हणाले?
Sunil Tatkare : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांना टार्गेट केलं जात असून राजकारणाचा स्तर खालावत असल्याचं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.
मुंबई: लोकसभेच्या निकालानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांकडून अजितदादांना टार्गेट करण्यात आलं, मात्र अजितदादांमुळे लोकसभेत नुकसान झालं नाही असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझाच्या 'झीरो अवर' कार्यक्रमात दिली. तसंच 2014 पासून आमची भाजपसोबत युतीची चर्चा सुरू होती असं समजा, असंही वक्तव्य त्यांनी केलंय आगामी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
महायुती म्हणून मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार हे ठरलं असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले. लोकसभेच्या वेळचं चित्र विधानसभेला असणार नाही, महायुतीला चांगलं संख्याबळ मिळेल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.
काही ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो
जागावाटपावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या लेव्हलला जागावाटपाची बेसिक चर्चा झाली आहे. ज्याचा आमदार आहे त्याला जागा सुटेल हा ढोबळ नियम आहेच, पण स्थानिक गणित बघून काही जागांवर वेगळा विचार होऊ शकतो.
विधानपरिषदेमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला
लोकसभेच्या निकालानंतर महायुतीकडून विधानसभेसाठी वेगळी रणनीती आखली जात आहे असं सांगत तटकरे म्हणाले की, लोकसभेनंतर कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्याचं काम सुरु आहे. त्यात विधानपरिषदेचा निकाल हे पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणारा ठरला आहे. परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह कामी आलं नाही. राष्ट्रवादीचे सगळे आमदार एकत्र राहिलेच, सोबत विरोधकांच्या 7 आमदारांची मतं आम्ही मिळवली.
मुस्लिम मतं दुरावली
लोकसभेच्या निकालावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभेत दलित, मुस्लिम, आदिवासी मतं महायुतीपासून दुरावली. 40 वर्षांचे संबंध असूनही लोकसभेत माझ्या मतदारसंघातही मुस्लिम मतं मिळाली नाहीत. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्नाचा फटका बसला. आरक्षणाबाबत विरोधकांकडेही उत्तर नाही, त्यामुळे ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत.
राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपचं किंवा महायुतीचं नुकसान झालं असं म्हणणं चूक ठरेल असंही ते म्हणाले.
बारामतीत अजित पवारच निवडून येणार
बारामती विधानसभा निवडणुकीवर बोलताना तटकरे म्हणाले की, बारामतीत अजितदादांचं काम बोलतं, विधानसभेत समोर कोणीही उभा राहिले तरी दादाच निवडून येतील. बारामतीत जे काही भावनिक मतदान होतं ते लोकसभेला होऊन गेलं. आता लोक दादांच्या विकासकामाला मतं देतील.
फडणवीस आणि अजित पवार टार्गेट
विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच विरोधकांचे टार्गेट असतील असं सुनील तटकरे म्हणाले. ते म्हणाले की, लोकसभेला भाजप, शिवसेना या मित्र पक्षांची साथ मिळाली, बारामतीतही मित्रपक्षांनी सहकार्य केलं. उद्धव ठाकरे-शरद पवारांचे टार्गेट नंबर वन फडणवीस असतील तर त्या खालोखाल त्यांचे टार्गेट नंबर दोन अजितदादा आहेत यात शंका नाही. राजकारणाचा स्तर खालावला आहे. हे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारं आहे.
2019 मध्ये यांची नैतिकता कुठे होती?
आम्हाला नैतिकता विचारणाऱ्यांनी 2019 साली काय केलं होतं असा सावाल विचारल तटकरेंनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. ते म्हणाले की, 2019 च्या निकालानंतर याची सुरुवात झाली. भाजप - शिवसेना युतीला जनतेनं स्पष्टपणे निवडून दिले होते, 2-3 दिवसात शपथविधी होऊन युती सरकार बनेल असं वाटत असताना शिवसेनेनं वेगळा विचार केला. आम्हाला नैतिकता विचारणाऱ्यांची नैतिकता 2019 साली मविआ सरकार स्थापन करताना कुठे गेली होती? मोदी शाहांसोबत अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने सौहार्दाच्या वातावरणात चर्चा होते, कुठेही कटुता नकारात्मकता नसते. त्यांचे जे चित्र रंगवले जाते तसे नाही असा आमचा अनुभव आहे.
अमित शाहांसोबत चर्चा 2014 पासूनच सुरु होती असं म्हणता येईल. त्यावेळी राज्यात भाजपने न मागता पाठिंबा दिलाच होता. 2017 साली तर सरकारमध्ये जाणार होतो. मग आताच दादांसारख्या बलशाली नेत्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं चुकीचं
सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंना टारगेट केलं जातंय, तसं व्हायला नको होतं. जो ताकदवर होतो तो टार्गेट होतो असं सुनील तटकरे म्हणाले. अजितदादांबद्दल संसदेत प्रश्न विचारला जातो म्हणजे दादांच्याबद्दल काहींच्या मनात किती द्वेष आहे आहे हे कळतं असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
ही बातमी वाचा: