Amruta Fadnavis : महात्मा गांधी जुन्या काळातील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य
अभिरूप न्यायालयात वकील अजय गंपावार यांनी अमृता फडणवीस यांच्यावर आठ पानांचे आरोपपत्र सादर केले. त्यावर अमृता फडणवीस यांनी आपली बाजू मांडत लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि दिलखुलास गप्पा मारल्या.
Amruta Fadnavis on Mahatma Gandhi and PM Narendra Modi : आपल्या भारत देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी (M K Gandhi) हे जुन्या भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित 'अभिरूप न्यायालयात' अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींना राष्ट्रपिता असल्याचे सांगत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्याचा आरोप वकिलांकडून अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला. यावर त्यांनी हे उत्तर दिले.
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात वकील अजेय गंपावार यांनी आठ पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणी अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्ती ॲड. कुमकुम सिरपूरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणीत अमृता फडणवीस यांनी आपली बाजू स्वत: मांडत लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यापैकी काही आरोप त्यांनी मान्यही केले. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होताच उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
मला फक्त आई आणि सासूची भीती
अमृता फडणवीस 'अभिरूप कोर्ट'मध्ये म्हणाल्या की, "मी स्वत: कधीही राजकीय वक्तव्यं (Political Statement) करत नाही, मला त्यात रस नाही. माझ्या वक्तव्यांना सामान्य लोक ट्रोल करत नाहीत. हे काम राष्ट्रवादी (NCP) किंवा शिवसेनेच्या (Shivsena) मत्सरी लोकांचं आहे. मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. मला फक्त आई किंवा सासूची भीती वाटते. बाकीच्यांची मला पर्वा नाही."
राजकारणात एंट्री घेण्याच्या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, "मला राजकारणात येण्यात रस नाही. मी माझे 24 तास राजकीय कामासाठी देऊ शकत नाही. माझे पती 24 तास समाजाच्या कामासाठी देतात. म्हणूनच जे राजकारण आणि समाजासाठी 24 तास देऊ शकतात, तेच राजकारण करण्यास पात्र आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत."
तीन वर्षांपूर्वीही अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला होता. त्यानंतरही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र त्या आपल्या वक्तव्यावर त्या ठाम राहिल्या होत्या. मात्र, त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
ही बातमी देखील वाचा
खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्री राजीनामा द्या; घोषणांनी परिसर दणाणला