अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता.
शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 'एक है तो सेफ है', असे म्हटले होते. यावर अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करुन हे नारे दिल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. तर, महायुतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) देखील या घोषणेचा विरोध केल्याचे दिसून आले. आता यावरून काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय.
बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना सल्ला
बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीत विकासाची चर्चा झाली पाहिजे. मात्र विष पेरणारी चर्चा केली जात आहे. सर्वांनी बटेंगे तो कटेंगेचा विरोध केला पाहिजे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. त्यावर हे बोलायला तयार नाहीत, अशा काहीतरी घोषणा दिल्या तर आपोआप मते पडतील असे त्यांना वाटते. अजित पवारांना हे मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे. फक्त विरोध करून गप्प बसणे योग्य नाही, असा सल्ला त्यांनी अजित पवारांना दिलाय.
भेद निर्माण करणे ही भाजपची पद्धत
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने (BJP) व्होट जिहादचा (Vote Jihad) आरोप करत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. याबाबत विचारले आता बाळासाहेब थोरात म्हणाले की, व्होट जिहाद हा नवा शब्द भाजपने काढला. कांदा उत्पादकांनी आम्हाला मते दिली तर कांदा जिहाद बोलणार का? शेतकऱ्यांनी मते दिली तर त्याला शेतकरी जिहाद म्हणायचे का? भेद निर्माण करणे ही भाजपची पद्धत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी या विषयावर ते बोलू शकत नाही. दिशाहीन करण्यासाठी व्होट जिहादसारखे मुद्दे काढले जात आहेत. हा सगळा विष पेरण्याचा कार्यक्रम आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या