KDCC Bank : सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच; चाचणी लेखापरीक्षणाच्या आदेशानंतर केडीसीसी बँकेकडून खुलासा
सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिले आहे. चाचणी लेखापरीक्षणासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर बँक प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिले आहे. चाचणी लेखापरीक्षणासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
चाचणी लेखापरीक्षण सुरु
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर बँकेचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे या चौकशीसाठी नियुक्ती विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. डी. छत्रीकर यांनी या चौकशीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, बँकेने थेट व सहभागीता योजने अंतर्गत एकूण 29 साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केला आहे. शिखर बँक आणि नाबार्डच्या धोरणानुसार त्यासाठी आवश्यक ते तारण घेतले आहे. यापैकी तपासणी करण्यात येत असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व ब्रिस्क फॅसिलिटीज या कारखान्यांचा समावेश आहे. या साखर कारखान्यांनाही इतर 27 साखर कारखान्यांप्रमाणेच नियमानुसार कर्जपुरवठा केलेला आहे. ही दोन्हीही खाती एनपीएमध्ये नाहीत, असेही बँकेने म्हटले आहे.
साखर कारखान्यांची कर्जे सुरक्षित
बँकेचे दरवर्षी वैधानिक लेखा परीक्षण, वैधानिक तपासणी, शिखर बँक तपासणी, अंतर्गत सी. ए. तपासणी केली जाते. या तपासण्यांमध्ये सर्व कर्जांची आणि व्यवहारांची तपासणी होत असते. विशेषत: साखर कारखाने, सुत गिरण्या यासारख्या मोठ्या कर्जखात्यांचीही तपासणी सविस्तरपणे होत असते. अशा तपासण्यांचा अहवाल सर्व यंत्रणांना उपलब्ध करुन दिलेला आहे. यामध्ये कोणतीही अनियमितता नसून कार्यालयीन शिफारशीशिवाय संचालक मंडळ बैठकीत अशी कोणतीही कर्जे मंजूर केली जात नाहीत. साखरसाठा, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस इत्यादी उपपदार्थही तारण म्हणून घेतले जातात. त्यामुळे अशा साखर कारखान्यांची कर्जे सुरक्षित आहेत, असे यात म्हटले आहे.
शेअर्स खरेदीच्या मुद्द्यावर वेळोवेळी खुलासा
बँकेकडे 39 हजार 53 शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची ठेव ठेवून त्यावरती तारण कर्ज काढून सरसेनापती साखर कारखान्याचे शेअर्स खरेदीच्या मुद्द्यावर बँकेने यापूर्वी वेळोवेळी वस्तुनिष्ठ खुलासा केलेला आहे. कदाचित साखर कारखाना उभारणीसाठी गोळा केलेले शेअर्स आणि घेतलेली ठेवतारण कर्जे याबद्दल गैरसमजातून गल्लत होत असावी, असे वाटते. अशा प्रकारची कोणतीही विशिष्ट तक्रार बँकेकडे आलेली नाही. तसेच, अशा प्रकारच्या ठेवीदाराचे नाव, शाखा किंवा कालावधी अशा प्रकारचा कोणताही तपशीलही दिलेला नाही. त्यामुळे सदरचा मुद्दा गैरसमज पसरवणारा आहे. बँकेची सर्व यंत्रणा तोंडावरच आलेल्या 31 मार्चच्या ठेव इष्टांक, एनपीए कमी करण्यासाठी वसुली इष्टांक अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्तींसाठी कार्यरत आहे, तरीही चौकशीला सहकार्य करु असे माने यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या