Devendra Fadnavis : सोलरयुक्त सहकारी गृहनिर्माण संस्था ही मोहीम हाती घ्यावी: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनसंबंधी नियम तयार असून ते येत्या 10 ते 12 दिवसात जाहीर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनने आता सोलरयुक्त सहकारी गृहनिर्माण संस्था ही मोहीम हाती घ्यावी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे ही संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे अतिशय कमी खर्चात अपार्टमेंटचे वीज बिल शुन्य करु शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशन व प्रदर्शन' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 साली सहकार कायद्यात दुरुस्ती करुन पहिल्यांदाच एक नवीन चॅप्टर सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता सहकार कायद्यात समाविष्ट केला. तेव्हापासून सहकार कायद्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांची दखल घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनची यासंदर्भातील नियम तयार करण्याची मागणी होती. ते नियम तयार करण्यात आले असून येत्या 10-12 दिवसांत ते प्रकाशित करु. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबद्दल परवानगी कोणी द्यायची, इव्हिक्शन कोणी करायचे, ताबा कोणी द्यायचा, यासंदर्भात संभ्रम होता. तो दूर करण्यासाठी एक समिती तयार केली व त्या समितीने दिलेल्या अहवालावर येत्या एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा विषय महत्त्वाचा आहे. कारण स्वयंपुनर्विकासामुळे 300, 350, 400 स्क्वेअर फुटांचे घर असलेल्या सदनिकाधारकांना 800, 900, 1000 ते 1100 स्क्वेअर फुटांचे घर मिळत आहे. यासंदर्भात आता क्लस्टर पद्धतीने स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घ्यायचा आहे. सोबतच स्वयंपुनर्विकासाकरता एनसीडीसीद्वारे रक्कम उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून येत्या तीन-चार महिन्यात यासंदर्भातही निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व सहकारी कार्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करण्यात येण्यात येईल, तसेच येत्या सहा महिन्यात यासंदर्भातील नोंदणी, थकबाकी, वसुली, सुनावणी अशा सर्व सेवा व्हॉट्सअपवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनने आता सोलरयुक्त सहकारी गृहनिर्माण संस्था ही मोहीम हाती घ्यावी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे ही संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे अतिशय कमी खर्चात अपार्टमेंटचे वीज बिल शुन्य करु शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

