Kolhapur Crime : लग्नाच्या आमिषाने महिला सहकाऱ्यावर अत्याचार; कळंबा जेल अधिकाऱ्याला बेड्या
कोल्हापूरमधील (Kolhapur Crime) कळंबा जेलमधील महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा जेलच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Kolhapur Crime : कोल्हापूरमधील (Kolhapur Crime) कळंबा जेलमधील महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा जेलच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. न्यायालयात त्याला हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. योगेश भास्कर पाटील असे बेड्या ठोकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडिताने जुनार राजवाडा पोलिसात धाव घेतल्यानंतर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने योगेश पाटीलला अटक केली.
अधिकारी योगेशने पीडित महिला कर्मचाऱ्यास लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जातिवाचक शिवीगाळ केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संबंधित पीडित महिला कळंबा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे.
त्रासाला कंटाळून पोलिसांकडे धाव
दरम्यान, तुरुंगाधिकारी योगेश पाटीलने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून 2021 पासून लैंगिक अत्याचार केले. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पीडिताने संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर योगेशने जातिवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे त्रासाला कंटाळून पीडित महिलेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
कळंबा जेल सातत्याने चर्चेत
यापूर्वी अवघ्या आठवडाभरापूर्वी, कळंबा जेलमध्ये मोक्कातंर्गत शिक्षा भोगत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत मल्लिक ऊर्फ दत्तात्रय रामचंद्र जाधव (रा. सातारा) हा कैदी जखमी झाला होता. सलीम ख्वाजासाहेब शेख, रोहन राजेंद्र जाधव, समाधान राजेंद्र जाधव, प्रतीक संजू जाधव (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
मल्लिकला मधुमेहाचा त्रास असल्याने जेलमधील कर्मचारी वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहातील दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर परत येताना 4 कैद्यांनी मल्लिक जाधवला अडवले. यावेळी धक्काबुक्की करत विटा आणि दगड भिरकावले. या मारहाणीत दत्तात्रय जाधव जखमी झाला. कारागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन कैद्यांना पांगवल्याने अनर्थ टळला होता. जाधवच्या गटातील सुद्धा कैदी धावून आल्याने तणाव वाढला होता.
सीम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल आढळला
मारहाण होण्यापूर्वी, कळंबा जेलच्या अधिकाऱ्यांना कैद्यांच्या झाडाझडतीत तुरुंगांच्या भिंतीत दुधाच्या पिशवीत लपवलेलं सीम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल सापडला होता. या प्रकाराने जेलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कैद्यांकडे मोबाइल, गांजा सापडणे, कैद्यांच्या मारामारी अशा घटनांमुळे कळंबा जेलची नाचक्की होत आहे. आता थेट लैंगिक अत्याचाराची घटना दाखल झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :